भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध गयाना येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याने विजयी षटकर मारला. पण तरीही तो तिलक वर्माचे सलग दुसरे अर्धशतक हुकल्याने बराच ट्रोल झाला होता.
पण असे असले तरी त्याला आता प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डीविलियर्स यांचा पाठिंबा मिळाला आहे.
Hardik Pandya: ‘तू धोनी होऊ शकत नाही!’, हार्दिकने विजयी षटकार मारला, तरीही का भडकले चाहते?
झाले असे की तिसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोव्हमन पॉवेलने गोलंदाजी केलेल्या १७ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तिलक वर्माने १ धाव काढली. त्यामुळे तो ४९ धावांवर पोहचला होता.
तसेच त्यावेळी भारताला विजयासाठी केवळ २ धावांची गरज होती आणि अद्याप १४ चेंडू बाकी होते. पाचव्या चेंडूवर हार्दिक स्ट्राईकवर आला.
त्यामुळे अनेकांना अपेक्षा होती की हार्दिक एक धाव घेऊन तिलकला स्ट्राईक देईल किंवा या षटकातील उर्वरित दोन्ही चेंडू खेळून काढेल. जेणेकरून तिलक स्ट्राईकला येईल आणि भारताला विजय मिळवून देण्याबरोबरच त्याचे अर्धशतकही पूर्ण होईल.
मात्र, हार्दिकने 17 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार खेचला आणि भारताने हा सामना 13 चेंडू राखूनच जिंकला. त्यामुळे तिलक ४९ धावांवर नाबाद राहिला. यामुळे हार्दिकवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली. अनेकांनी त्याला स्वार्थी म्हटले.
पण, या घटनेबद्दल हर्षा भोगले यांनी हार्दिकला पाठिंबा देणारे ट्विट केले आहे, ज्याला डीविलियर्सनेही सहमती दर्शवली आहे.
AB de Villiers: जेव्हा ‘मिस्टर 360’ च्या बॅटने केलेली कमाल…! वाचा डिविलियर्सच्या 5 सर्वोत्तम खेळींबद्दल
हर्षा भोगले यांनी ट्वीट केले की ‘तिलक वर्माचे अर्धशतक हुकल्याबद्दल झालेल्या चर्चेने मी हैराण झालो आहे. हा काही मैलाचा दगड नाही, खरंतर टी20 क्रिकेटमध्ये शतकाशिवाय (जे दुर्मिळ आहे) कोणताही मैलाचा दगड नाही.’
‘आपण सांघिक खेळात वैयक्तिक यशाला खूप जास्त महत्त्व देत आहोत. टी20 क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या वैयक्तिक आकडेवारीमध्ये अर्धशतकाची नोंद व्हावी असे मला वाटच नाही. जर तुम्ही जलद गतीने धावा करत असाल, तर तुमची सरासरी आणि धावगतीच महत्त्वाची आहे.’
यानंतर एबी डीविलियर्सने यावर प्रतिक्रिया देताना लिहिले की ‘धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शेवटी कोणीतरी हे बोलले.’
दरम्यान, मंगळवारी झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवल्याने मालिकेतील आपले आव्हान कायम राखले आहे. सध्या 5 सामन्यांच्या या टी20 मालिकेत वेस्ट इंडिज पहिल्या तीन सामन्यांनंतर 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.