दमदार कथा, अंगावर काटा आणणारे संवाद, अन्… सेक्स एज्युकेशवर भाष्य करणारा अक्षयचा OMG 2 कसा आहे?
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ (OMG 2) चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ओएमजी(OMG) या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. अकरा वर्षांपूर्वी या चित्रपटातून एक वेगळा विषय मांडला गेला होता.
आता या चित्रपटाच्या सीक्वेलमधून पुन्हा एकदा महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ओएमजी(OMG) हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या सीक्वेलबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. शुक्रवारी(११ ऑगस्ट) ‘ओएमजी २’ (OMG 2) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
अमित राय दिग्दर्शित ‘ओएमजी २’ (OMG 2) चित्रपटात सेक्स एज्युकेशनसारख्या महत्त्वाच्या मुद्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘ओएमजी’ (OMG) चित्रपटात अक्षय कुमार श्रीकृष्णाच्या भूमिकेत होता. या चित्रपटात त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. पंकज त्रिपाठी या चित्रपटात भगवान शंकराचा निस्सीम भक्त असलेल्या कांती शरण मुग्दल या सामान्य आणि प्रामाणिक व्यक्तीच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री यामी गौतमने वकील कामिनी महेश्वरीची भूमिका साकारली आहे. ‘ओएमजी २’ (OMG 2) चित्रपटाच्या कथेत या तीन पात्रांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या जीवनातील काही घडामोडींवरच या चित्रपटाची कथा आहे.
पत्नी, मुलगा आणि मुलीबरोबर सुखाने आयुष्य जगणाऱ्या कांती मुग्दल यांच्या कुटुंबापासून चित्रपटाची सुरुवात होते. कांती मुग्दल यांच्या मुलाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्या सुखी आयुष्यात वादळ येतं. या व्हिडिओत तो शाळेत हस्तमैथून(Masturbating) करताना दिसत असतो. या घटनेनंतर त्याला शाळेतून काढून टाकलं जातं. समाजातही मुग्दल आणि त्यांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. या व्हिडिओमुळे झालेल्या बदनामीमुळे कांती मुग्दलचा मुलगा नैराश्यात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करतो. या संपूर्ण प्रकारामुळे कांती मुग्दलही प्रचंड तणावाचे जीवन जगत असतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्यातून आनंद हिरावून गेलेला असतो. अशातच आपल्या भक्ताची मदत करण्यासाठी भगवान शंकर धावून येतात. मुलाचा मानसन्मान परत मिळवण्यासाठी आणि सेक्स एज्युकेशनचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्याला कायदेशीर लढाई लढण्यासाठी प्रोत्साहित करतात. शाळेविरुद्धच्या या कायदेशीर लढाईत मुग्दल कुटुंबीयांची केस लढण्यासाठी कोणताच वकील पुढे येत नाही. शेवटी कांती मुग्दल स्वत:च वकील कामिनी महेश्वरीविरुद्ध लढा देतात.
कांती मुगद्लला या संपूर्ण लढाईत भगवान शंकराची कशी मदत होते? शाळेविरुद्धचा लढा जिंकून मुलाचा आणि कुटुंबीयांचा आत्मसन्मान तो परत मिळवतो का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चित्रपट पाहायला हवा. पण, विसाव्या शतकात मुलांना फोन, इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सहज उपलब्ध असताना सेक्स एज्युकेशनचे धडे किती महत्त्वाचे आहेत, हे या चित्रपटाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आलं आहे. विषयाची उत्कृष्ट मांडणी, मजेदार आणि विषयाची गंभीरता मांडणारे संवाद, क्लायमेक्स सीन यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. ‘ओएमजी २’ (OMG 2) या चित्रपटाचा पहिला भाग तुम्हाला खिळवून ठेवतो. मध्यांतरानंतर चित्रपटाची कथा थोडीशी रेंगाळलेली वाटते. पण, तरीही चित्रपट तुम्हाला निराश करत नाही. क्लायमेक्स सीनपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो.
‘ओएमजी २’ (OMG 2) हा चित्रपट त्याच्या स्टारकास्टमुळेही जास्त चर्चेत होता. तगडे कलाकार असल्याने सगळ्यांनी कामही उत्तम केलं आहे. पंकज त्रिपाठींनी मुख्य भूमिकेची बाजू उत्तमरित्या पेलली आहे. यामी गौतम वकिलाच्या भूमिकेत चोख बसली आहे. परंतु, ‘ओएमजी २’ (OMG 2) पाहिल्यानंतर अक्षय कुमारच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. चित्रपटाची कथा पंकज त्रिपाठींनी साकारलेल्या कांती मुग्दलच्या कुटुंबाची असल्याने त्यावर जास्त भर देण्यात आला आहे. पण, भगवान शंकराच्या भूमिकेत असलेला अक्षय भाव खाऊन जातो. अक्षयच्या तोंडी असलेले संवाद तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाहीत.