90 टक्के भाषण फक्त ‘इंडिया’वरच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा विरोधकांकडून समाचार
मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधकांकडून आणलेल्या अविश्वास दर्शक ठरावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल पावने दोन तास भाषण केलं. मात्र तब्बल दीड तास भाषण झालं तरी मोदींनी एकदाही मणिपूरचा उल्लेख केला नव्हता.
त्यामुळे विरोधकांनी अखेर वॉकआऊट केला. वॉकआऊट नंतर संसदेबाहेर विरोधकांनी पंतप्रधानांच्या त्या भाषणाचा समाचार घेतला.
‘पंतप्रधानांनी मणिपूरमधील महिलांसोबत झालेल्या घटनांवर बोलावं, अर्थव्यवस्था, बेरोजगारी यावंर बोलावं अशी आमची अपेक्षा होती. मात्र त्यांचे तब्बल 90 टक्के भाषण हे फक्त इंडियावर (विरोधकांवर) होते’ अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
‘पंतप्रधान मोदी हे लोकसभेत राजकीय भाषण देत होते. तब्बल 1 तास 45 मिनिटं भाषण केल्यानंतरही त्यांनी मणिपूरचा उल्लेख केला नव्हता. आमच्या अविश्वास प्रस्तावाला मोदींनी उत्तरंच दिले नाही’, असा हल्लाबोल काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केला.
‘सबका साथ असं बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी एवढे मोठे भाषण केले त्यातून मणिपूरच्या महिलांना काय संदेश दिला. जर ते त्यांच्यासोबत आहे तर त्यांनी त्यांना न्याय मिळावा म्हणून काय केलं ते सांगाय़ला हवं होतं, असा संताप शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिम्रत कौर बादल यांनी व्यक्त केला.
‘संपूर्ण देशाला मोदींना ऐकायचे होते. मात्र एक तास चाळीस मिनिटाच्या भाषणानंतरही त्यांनी मणिपूरवर एक शब्दही काढला नाही. ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. आम्ही तासभर आधीच वॉकआऊट करायाला हवा होता’, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केली आहे.