इम्रान खान यांना अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर पंतप्रधानपदावरुन हटविले! ‘लीक’ कागदपत्रांतून गौप्यस्फोट
फेब्रुवारी २०२२मध्ये युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने तटस्थ भूमिका घेतली. यावेळी तत्कालिन पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेला पाठिंबा दिला नाही.
यामुळेच यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर अमेरिकेने दाबाव टाकला असावा, असा दावा ‘दि इंटरसेप्ट’ या वृत्तसंकेतस्थळाने लीक झालेल्या कागदपत्रांच्या हवाला देत केला आहे. ( Pakistani leaked document )
पाकिस्तानच्या तटस्थ भूमिकेवर अमेरिकेची टीका
७ मार्च २०२२ रोजी अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत असद मजीद खान आणि डोनाल्ड लू यांच्यासह अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या दोन अधिकाऱ्यांमधील संभाषणाच्या अंशांसह एक लीक झालेल्या कागदपत्राचा हवाला देत द इंटरसेप्टच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार ब्यूरोचे सहाय्यक परराष्ट्र सचिव डोनाल्ड लू यांनी युक्रेनबाबत पाकिस्तानच्या तटस्थ भूमिकेवर टीका केली होती. अमेरिकेतील तत्कालीन पाकिस्तानी राजदूतांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अविश्वास ठरावाचे संकेत दिल्याचे दस्तऐवजात दिसून आले.
…. तर वॉशिंग्टनमध्ये सर्व काही माफ केले जाईल
रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. यानंतर पाकिस्तान इतकी आक्रमक तटस्थ भूमिका का घेत आहे, असा सवाल लू यांनी केला होता. त्यांनी पंतप्रधान खान यांच्या मॉस्को भेटीबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच पंतप्रधान इम्रान खान यांना हटविल्यास वॉशिंग्टनमध्ये सर्व काही माफ केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती. तसेच पाकिस्तानी राजदूताने रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेशी पाकिस्तानचे संबंध खराब होणार नाहीत, अशी आशा व्यक्त करून आपली चर्चा संपवली होती. याबैठकीनंतर एक दिवसानंतर म्हणजे ८ मार्च २०२२ रोजी इम्रान खानच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. त्यानंतर, 10 एप्रिल रोजी खान यांना सत्ता सोडावी लागली होती.
अमेरिकेने आरोप फेटाळले
इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरुन हटविण्यात अमेरिकेच्या कथित भूमिकेबद्दलच्या आरोपांवर बोलताना अमिरेकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, सर्व आरोप निराधार आहेत.
इम्रान खान यांनीही केले होते अमेरिकेवर आरोप
भ्रष्टाचार प्रकरणी२७ मार्च २०२२ रोजी इम्रान खान यांना अटक झाली होती. यावेळी त्यांनी मला पदावरुन हटविण्याचा कट रचला गेला आहे, असा आरोप इम्रान खान यांनी केला.