ठाणेकरांनो, शक्य असल्यास मुंबई नाशिक महामार्गावरून वाहतूक टाळा ; ठाणे पोलिसांचे आवाहन
ठाणे. मुंबई अहमदाबाद मार्गावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले असून वाहन चालक चिंचोटी येथून मुंबई नाशिक महामार्गाने वाहतूक करत आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे ठाणेकरांनी शक्य असल्यास नाशिक महामार्गाचा वापर टाळावा असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहेमुंबई अहमदाबाद मार्गावर पाणी साचल्याने घोडबंदर येथील गायमुख ते चिंचोटी पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे गुजरात, वसई येथून ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारे वाहन चालक आणि अवजड वाहन चालक चिंचोटी मार्गे मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेने वाहतूक करत आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर मोठा वाहतूकीचा भार येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून या मार्गावर खड्डे पडल्याने दररोज वाहतूक कोंडीचा त्रास जिल्ह्यातील वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. त्यात मुंबई अहमदाबाद मार्गाची वाहने मुंबई नाशिक महामार्गावर आल्यास मोठा वाहतूकीचा भार या मार्गावर येणार असून कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे ठणेकरांनी शक्य असल्यास मुंबई नाशिक महामार्गावरून वाहतूक करू नये असे आवाहन ठाणे पोलिसांकडून केले जात आहे.