वास्को पोलिसांनी अमित कामत (18) आणि फहाद तीनवळे (25) या दोघांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 1.30 वाजता गस्तीवर असताना पोलिस मांगोर येथे पोहोचले, तेव्हा तेथे दोन युवक रस्त्यावर बसून दारू पिताना त्यांना दिसले.पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता, दोन्ही युवक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिस उपनिरीक्षक मयूर सावंत आणि हेडकॉन्स्टेबल जयेश गावकर यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. त्यांनी दारूच्या नशेत हेडकॉन्स्टेबल जयेश गावकर यांना धक्काबुक्की करून स्वतःच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली आणि दुसऱ्याच्या मानेवर वार केले. तसेच पोलिसांनी आपल्यावर हल्ला केल्याचा कांगावा या दोघांनी सुरू केला.
Bihar Crime: दोन बायका अन्…! बिहारमध्ये दोन पत्नींनी मिळून केली पतीची हत्या
त्या दोघा युवकांनी पोलिसांना शिवीगाळही केली. त्यानंतर त्यांनी तिथे असलेल्या बियर बाटलीने स्वतःवर हल्ला करून जखमी करून घेतल्यानंतर दारूच्या नशेत धांगडधिंगाणा घालणाऱ्या त्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर वास्को पोलिस स्थानकावर आणले. आज पहाटे 4.30 च्या सुमारास त्यांना अटक केली. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.