चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (मार्च ८, इ.स. १९३०- एप्रिल २६, इ.स. १९७६) हे एक मराठी कवी व लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री, खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने ‘मौज’मधे छापण्यास पाठवून दिल्या. ‘मौज’च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.
ये रे घना
ये रे घना
न्हाउं घाल
माझ्या मना …
खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला.