ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

निवडणुकीच्या तयारीला लागा : राहुल गांधी


नवी दिल्ली,  : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आपापसातील मतभेद संपवून कामाला लागावे आणि आगामी लोकसभेसाठी राज्यातून किमान 20 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, अशी सूचना राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना केली आहे.

राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी दिल्लीत पार पडली. येत्या सप्टेंबरमध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात पदयात्रा काढावी आणि त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बस यात्रा सुरू करावी, असा ठरावही बैठकीत संमत करण्यात आला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, सुनील केदार, वर्षा गायकवाड आदी प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षसंघटनेतील फेरबदल, आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवड, अनपेक्षित घडणार्‍या राजकीय घडामोडी, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड, या महत्त्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपच्या दाव्यानंतर बैठक

काँग्रेसचे अनेक आमदार आपल्या पक्षावर नाराज असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच ‘एनडीए’मध्ये सहभागी होऊ इच्छित असल्याचा दावा भाजपकडून सतत केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी काय करता येईल, यावर आजच्या बैठकीत मंथन झाले. त्यासाठीच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आले होते.

सध्याच्या स्थितीत पक्षामध्ये काही गडबड झाली, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने काँग्रेससाठी तो मोठा धक्का असेल. कारण, 44 आमदार असलेला काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे.

सर्व मतदारसंघांत तयारी सुरू

आम्ही राज्यातील सर्व म्हणजे 48 मतदारसंघांत लोकसभा निवडणुका लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिली. ते म्हणाले, जर युती किंवा आघाडीचा विषय उपस्थित झालाच, तर संबंधित पक्षांशी चर्चा करून पुढील व्यूहरचना निश्चित केली जाईल.

पटोलेंविरुद्ध नाराजी

या बैठकीत विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याविरोधात नाराजीचा सूर लावल्याची माहिती आहे. तसेच बैठकीनंतर काही नेत्यांना पक्षश्रेष्ठींशी व्यक्तिगत पातळीवर चर्चा करायची होती. तथापि, तसे झाले नाही.

महाराष्ट्रातील अनुभव सर्वात चांगला : राहुल गांधी

काँग्रेसने महाराष्ट्रापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. प्रत्येकाने गट-तट विसरून काँग्रेसला मजबूत केले पाहिजे. भारत जोडो यात्रेचा अनुभव देशात सर्वात चांगला महाराष्ट्रामध्ये आल्याचे राहुल गांधी यांनी बैठकीत सांगितले; तर महाराष्ट्र हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून, आता तो आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे खर्गे यांनी स्पष्ट केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *