ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

मुंबईसह राज्यातील विद्यापीठांना सहकार्य करण्यास अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठ उत्सुक


जगातील युवा देश असलेला भारत हा प्रतिभासंपन्न लोकांचा देश असून आगामी काळात भारतातील कौशल्य प्रशिक्षित लोक जगातील अनेक देशांना व अर्थव्यवस्थांना मदत करताना दिसतील, असे नमूद करून भारत हा मानवी संसाधनांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश असेल, असे प्रतिपादन अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाचे सहयोगी प्रोव्होस्ट डॉ. एरिक ऍम्ब्रेख्त यांनी केले आहे.

२०५- वर्षे जुन्या सेंट लुईस विद्यापीठाच्या एका शिष्टमंडळाने डॉ. एरिक ऍम्ब्रेख्त यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच कुलपती रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई विद्यापीठासह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांसोबत कौशल्य प्रशिक्षणासह विविध विषयांवर सहकार्याची क्षेत्रे ठरविण्यासाठी विद्यापीठाचे शिष्टमंडळ भारत भेटीवर आले असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण, दुहेरी पदवी व कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत तसेच शिक्षकांच्या सक्षमीकरणाबाबत आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षकांना प्रशिक्षणासाठी अमेरिका व स्पेन येथे पाठविणार

सेंट लुईस विद्यापीठाचे शैक्षणिक कॅम्पस अमेरिकेतील मिसौरी व स्पेनमधील माद्रिद येथे असून भारतातून शिक्षकांना प्रशिक्षणासाठी तेथे पाठविले जाईल किंवा तेथील शिक्षकांना भारतात प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले जाईल असे त्यांनी सांगितले.

सेंट लुईस विद्यापीठ जनसंवाद व सहकार्य, नेतृत्वगुण, रचनात्मक चिंतन व गहन चिंतन ही कौशल्ये प्रदान करते तसेच विद्यार्थ्यांना आभासी माध्यमातून इंटर्नशिप, कार्यशाळा व स्पर्धांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी करून घेते अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रात सहा समूह विद्यापीठांसह एकूण २६ विद्यापीठे असून तीस लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत अशी माहिती देताना सेंट लुईस विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या किंमतीमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण द्यावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

यावेळी सेंट लुईस विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे उपाध्यक्ष लूशेन ली, सल्लागार सुंदर कुमारसामी व जागतिक उपक्रम विभागाच्या संचालिका अनुशिका जैन उपस्थित होत्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *