कोल्हापूर, : राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ताकदीने निवडणूक लढविण्यासाठी आतापासून तयारीला लागा, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
दोन्ही लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी व माजी आमदारांची मुंबईत ‘मातोश्री’वर मंगळवारी दुपारी बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यासह इतरांकडून दोन्ही मतदारसंघांसह विधानसभा मतदारसंघांतील सद्यस्थितीचा आढावा ठाकरे यांनी घेतला. दरम्यान अरुण नरके, चेतन नरके व संदीप नरके यांच्या उपस्थितीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
राज्यातील निवडणुका लढण्यासाठी होणार्या महाआघाडीच्या चर्चेत पदाधिकार्यांनी लक्ष घालू नये. राजकीय समीकरणे बदलल्याने आतापासून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसह विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणी बळकट करा. प्रसंगी स्वबळावर निवडणुका लढण्याइतपत शिवसेना प्रबळ करा. एकजुटीने काम करून स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे जाळे निर्माण करा, असेही ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे व मुरलीधर जाधव, माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, संजय घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाप्रमुख देवणे यांच्याविरुद्ध तक्रार केलेल्या सर्वांसह ठाकरे यांनी बैठक घेतली. सर्व शिवसैनिक प्रामाणिक असून वाद घालण्याची ही वेळ नाही. सर्वांनी आपसांतील वाद बाजूला ठेवून पक्षासाठी झटून कामाला लागावे, अशी सूचनाही ठाकरे यांनी केली