केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक, तर काँग्रेसचे पाच राज्यात मौन आंदोलन; आज दिवसभरात
राहुल गांधी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून मौन आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
तर दिल्लीत आज केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर हिमाचाल प्रदेश, उत्तराखंडमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक
दिल्लीत केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचे मौन आंदोलन
महाराष्ट्रासह पाच राज्यात काँग्रेसकडून मौन आंदोलन करण्यात येणार आहे. . राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेस मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ‘मौन सत्याग्रह’ आंदोलन करणार आहे. या आंदोलनात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान यांच्यासह इतर नेते उपस्थित रहाणार आहेत.
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय
राज्यात 13 जुलैपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये पवार गट सक्रिय
नाशिक जिल्ह्यातील पवार गट सक्रीय होणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला त्र्यंबकेश्वर पासून सुरुवात होणार आहे. शरद पवारांच्या सभेनंतर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
उदय सामंत नागपूर दौऱ्यावर
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत नागपूर दौऱ्यावर आहेत. विदर्भातील औद्योगिक विकास आणि सरकारच्या उद्योग विषयक योजना यासंदर्भात आढावा उदय सामंत घेणार आहेत.
मातोश्रीवर विभागनिहाय बैठका
एकीकडे महाराष्ट्र दौऱ्याचा नियोजन सुरू असताना ठाकरे गटाने मुंबईवर आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीचे पकड मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मातोश्रीवर विभागनिहाय बैठका आयोजित करण्यात आल्या आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील महत्त्वाच्या सुनावण्या
मुंबईसह आसपासच्या परिसरातील वृक्षांभोवती उभारण्यात आलेल्या सिमेंटच्या कव्हरींगविरोधात ठाण्यातील पर्यावरणवादी रोहीत जोशी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी.
मुंबई आंतरराष्ट्रीय परिसरातील दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्याची तक्रार करत गुजराती विचार मंचने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.
मुंबई उच्च न्यायालयाला मिळणाऱ्या वारेमाप सुट्यांविरोधात काही वकिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी.