काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.
17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.
1984मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं.
त्याच विषयात त्यांनी 1988मध्ये PhD पूर्ण केली.
हरिणायाची मुलगी ते नासाची अंतराळवीर
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.
नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.
नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.
त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.
नोव्हेंबर 1996मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.
शेवटी तो दिवस उजडलला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.
एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.
कल्पना यांचा शेवटचा प्रवास
नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.
जानेवारी 2003च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.
1 फेब्रुवारी 2003ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.
त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.
22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.
तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.