ताज्या बातम्या

आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर


पुणे शहरामध्ये जन्मलेल्या आनंदीबाई जोशी ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी डॉक्टरकी मध्ये पदवी मिळवली. ज्या काळामध्ये मुलींना शिक्षणासाठी बंदी होती त्या काळामध्ये त्यांनी परदेशामध्ये जाऊन आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केली.

आनंदीबाई जोशी यांचे लहानपणीचे नाव हे यमुना होते. त्यांचे पालन पोषण ही त्या काळात झाले होते ज्या काळामध्ये मुलींवर खूप बंधने होती. त्यांचा विवाह अवघ्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असलेल्या गोपाळ विनायक जोशी यांच्यासोबत झाला आणि लग्नानंतर त्यांचे नाव आनंदीबाई असे ठेवण्यात आले. आनंदीबाई जोशी यांनी चौदाव्या वर्षी एका मुलाला जन्म दिला.परंतु योग्य वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे दहा दिवसांमध्ये त्यांचे बाळ दगावले. याच गोष्टीचा त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या.आनंदीबाई या दुःखातून सावरल्या आणि त्यांनी स्वतः डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी त्या काम करू इच्छित होत्या. त्यांचे पती गोपाळराव हे प्रगतशील विचारवंत होते आणि महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारे होते.

आनंदीबाईंना शिक्षणामध्ये रस आहे हे गोपाळरावांनी आधीच हेरले होते. आपल्या पत्नीला इंग्रजी शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला होता. गोपाळराव पोस्टमध्ये कारकुनाची नोकरी करत होते. नोकरीनिमित्त त्यांची नेहमी बदली होत असे, कोल्हापूर, मुंबई, भुज, कोलकत्ता, बराकपूर, श्रीरामपूर या प्रत्येक ठिकाणी गोपाळराव यांची बदली झाली होती आणि आनंदीबाई त्यांच्यासोबत होत्या.

कोल्हापूरमध्ये जेव्हा मिश्र्नाऱ्यांची गोपारावांशी ओळख वाढली तेव्हा त्यांना असे वाटले की आनंदीबाईंना पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवावे. त्यावेळी अमेरिकेला जाण्याची त्यांची इच्छा होती पण ते त्यांना जमले नाही.

अमेरिकेला पाठवण्यासाठी पैशांची जमवाजमव सुरू केली तसेच त्यांना सोबती शोधण्यासाठी दोन ते चार वर्षे गेली. बदलीच्या सर्वच ठिकाणी आनंदीबाईंना समाजाचे व शेजारील लोकांचे खूप विपरीत अनुभव आले. त्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेतात तसेच गोपाळरावांसोबत बाहेर फिरतात याचा समाजाला खूप राग होता. तसेच त्यांना नेहमी अपमानास्पद बोलले जात असे परंतु या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता त्या नेटाने आपला अभ्यास करत असे.

एक विवाहित स्त्री परदेशात जाऊन शिक्षण घेणार हे समाजाला मान्य नव्हते. आनंदीबाई आणि गोपाळराव परदेशात जाऊन धर्मांतर करतील अशी त्यांना भीती वाटत होती.

ज्यावेळी आनंदीबाईंना हे सर्व समजले त्यावेळी त्यांनी सर्व लोकांना एका महाविद्यालयांमध्ये बोलावले आणि त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली, आणि महिला डॉक्टरांचे महत्व त्या सर्वांना समजावून सांगितले. परदेशात जाऊन धर्मांतर करणे किंवा नोकरी करणे असे माझे मत नाही, तर भारतात राहून इथल्या लोकांची सेवा करणे अशी माझी इच्छा आहे असे आनंदी बाईंनी त्यांना सांगितले.

1880 मध्ये प्रसिद्ध अमेरिकन मिशनरी रॉयल विल्डर यांना गोपाळरावांनी पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी आनंदीबाईंना वैद्यकीय औषधांच्या अभ्यासाची आवड आहे तर काही मदत मिळू शकेल का असे विचारले. तेव्हा रॉयल विल्डर यांनी आनंदीबाईंना काहीतरी मदत मिळेल या उद्देशाने ते पत्र एका वर्तमानपत्रामध्ये छापले.

त्यावेळी तो लेख अमेरिकेतील एका श्रीमंत कार्पोरेट यांनी वाचला आणि आनंदीबाईंची असलेली शिक्षणाबद्दलची तळमळ पाहून त्यांनी आनंदीबाईंना मदत करण्याचे ठरवले.

त्या कार्पोरेट बाईंनी पुढे पत्रव्यवहार करून आनंदीबाईंशी आपले नाते जोडले. आनंदीबाई त्यांना मावशी म्हणत तर त्या आनंदीबाईंना ‘आनंदाचा झरा’ म्हणत. आनंदीबाईंनी अमेरिकेला जाण्यापूर्वी तेथील एका कॉलेजच्या सभागृहात मी अमेरिकेस का जाते यावर एक इंग्रजी व्याख्यान दिलं होतं.

त्यामध्ये एक मुद्दा असा होता की पृथ्वी वर हिंदुस्ताना एवढा रानटी देश दुसरा कोणताही नाही. महिला डॉक्टर असणाऱ्या स्त्रियांची हिंदुस्थानामध्ये अतिशय गरज आहे. हिंदुस्तानातील सर्वच स्त्रियांना पुरुषांकडून चिकित्सा करून घेणे मान्य नाही. त्यामुळे स्त्री डॉक्टरची गरज ओळखून डॉक्टर बनण्यासाठी त्या अमेरिकेला गेल्या.

अठराव्या वर्षी एका अमेरिकन बाईच्या सोबतीने त्यांनी बोटीने प्रवास केला. त्यांचा पोषाख हा साडीच होता. त्या शाकाहारी असल्यामुळे बोटीवर त्यांची उपासमार झाली आणि पुढे चारही वर्षे उपासमार झाल्यामुळे त्या आजारी पडल्या.

परदेशी पोशाख न वापरता त्यांनी साडी हाच आपला पोशाख ठेवला आणि त्यावर त्या जॅकेट घालत असे. त्यामुळे तेथील बर्फाळ प्रदेशाचा त्यांना खूप त्रास झाला. त्यातच त्या अभ्यास करून स्वतःचा स्वयंपाकही करत असे. समाज, नातलग यांचा द्वेष सहन करत त्या आपले कार्य करत होत्या. तिथे त्यांना कॉर्पोरेट बाई आणि कॉलेजच्या प्रिन्सिपल या दोन चांगल्या स्त्रिया भेटल्या.

परंतु इतर स्त्रियांनी आनंदीबाईंना त्रास दिला. याचा त्यांच्या मनावर आणि शरीरावर ही परिणाम झाला त्या अर्धपोटी राहिल्यामुळे आजारपण त्यांच्यामागे लागले. भारतातील लोक तर असे म्हणत असे की आनंदीबाई आता ख्रिस्ती धर्म स्वीकारूनच भारतात परत येणार आणि अमेरिकेतील लोकही त्यांना क्रिस्ती धर्म स्वीकारा असा उपदेश देत होते.

स्वदेशी पोशाख(साडी आणि पोलके) स्वदेशी जेवण आणि स्वदेशी पद्धतीचे आचरण यांचा आनंदीबाईंनी कधीही त्याग केला नाही.

जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून मार्च इ.स.1886 मध्ये आनंदीबाईंनी एम.डी. ची पदवी मिळवली. पदवी मिळाल्यानंतर विक्टोरिया राणी कडूनही त्यांचे अभिनंदन झाले. या खडतर प्रवासात गोपाळरावांचा त्यांना नेहमी पाठिंबा होता.

त्यांच्या पदवीदान समारंभालाही गोपाळराव स्वतः हजर होते. भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी त्यांचे उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

जाताना त्या एकट्या होत्या परंतु परत येताना गोपाळराव त्यांच्यासोबत होते. परंतु तोपर्यंत यांना क्षयाची बाधा झाली होती. बोटीवरही कोणत्याही गोऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले नाहीत.

भारतात परतल्यानंतर ही येथील डॉक्टर किंवा वैद्य यांनी स्त्री म्हणून त्यांच्यावर उपचार केले नाहीत. आणि वयाच्या अगदी विसाव्या वर्षी त्यांना क्षयरोग झाला. 26 फेब्रुवारी 1887 रोजी आनंदी बाईंचा मृत्यू झाला.

अमेरिकेतील कार्पोरेट कुटुंबीयांनी त्यांच्या स्मशानात आनंदीबाई यांचे छोटेसे थडगे बांधले आणि त्यावर आनंदी जोशी एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या असे लिहिले.

परदेशात शिकून डॉक्टर की ची पदवी घेणारी पहिली भारतीय स्त्री असे कोरून त्यांचे स्मारक बनवले. हे सर्व वाचताना आनंदीबाई ह्या किती थोर होत्या हे आपल्याला समजते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *