आंघोळ करताना नाकावाटे मेंदूपर्यंत पोहोचला, मेंदू कुरतडणाऱ्या अमिबामुळे 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
एका दुर्मिळ प्रकाराच्या संसर्गामुळे केरळमधील 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. विद्यार्थी दशेत आपण ‘अमिबा’बद्दल वाचलं आहे, त्याच्या आकृत्याही काढल्या आहेत. याच अमिबाने या मुलाचा मेंदू कुरतडला ज्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला.दूषित पाण्यामध्ये असलेल्या अमिबाने या मुलाच्या मेंदूपर्यंत प्रवेश केला होता आणि तो हळूहळू कुरतडायला सुरुवात केली होती. ही घटना झाल्यानंतर दूषित पाणी आंघोळीसाठी वापरणे टाळावे असा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या मुलाच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले की, अलपुझ्झातील पनावल्लीमध्ये राहणाऱ्या एका मुलाला ‘प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस’ चा संसर्ग झाला होता. यापूर्वी या संसर्गाच्या राज्यात 5 घटना घडल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.
2016 , 2019, 2020 आणि 2022 मध्ये या संसर्गाने ग्रासित एकूण 5 रुग्ण सापडले होते. या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. ताप, डोकेदुखी, उलट्या फिट येणे ही या संसर्गाची लक्षणे आहेत. या संसर्गाने बाधित लोकांच्या मृत्यूचे प्रमाण हे शंभर टक्के असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. हा संसर्ग साठलेल्या पाण्यात असलेल्या अमिबामुळे होत असल्याचं दिसून आलं आहे.