मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात पावसाने जोर धरलेला आहे. राज्यातील राजकीय वातावरण जरी तापलेले असले तरी होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी गारवा पसरलेला आहे. परंतु अद्यापही राज्यातील काही जिल्हे असे आहेत, ज्या ठिकाणी पावसाचा एक थेंबही पडलेला नाही.ज्यामुळे त्या ठिकाणचा शेतकरी हा चिंतेत सापडलेला आहे. पण असे असताना आता हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये मुंबईसह उपनगरात आणि ठाणे, नवी मुंबई परिसरात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलेले आहे. (Orange and Yellow Alert issued by Meteorological Department for ‘these’ districts)
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यात आज (ता. 08 जुलै) काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यासह हवामान विभागाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पालघर जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विदर्भामध्ये देखील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आता सातारा आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात देखील आता पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे पहिला पाऊस पडल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती, त्यांच्यावरचे दुबार पेरणीचे संकट टळले असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे नाशिककरांच्या पाणी कपातीतही घट झालेली आहे. त्यासोबतच आता वसई विरार, नालासोपाऱ्यात देखील जोरदार पाऊस पडला असून यामुळे सखल भागात पाणी साचलेले यला मिळत आहे. वसई विरार महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील कामही पूर्ण न केल्यामुळे आता पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. ज्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.