ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

Monsoon Alert : पावसामुळं देशातील बहुतांश भागात पूरस्थिती; ‘या’ राज्यांमध्ये जाणं टाळाच


मान्सून यंदाच्या वर्षी अपेक्षेहून काहीसा उशिरानं भारतात पोहोचला पण आता मात्र त्यानं अतिशय वेगानं सारा देश व्यापल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला दक्षिणेकडील राज्यांसोबतच महाराष्ट्रासह देशाच्या उत्तर भागातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे.

काही राज्यांमध्ये तर पावसानं हाहाकार माजवला आहे. ज्यामुळं अनेकांचेच पर्यटनाचे (travel) बेतही फसले आहेत.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 7 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh, Uttarakhand) या राज्यांमध्ये येत्या काळात दमदार पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे.

हिमाचल प्रदेशला जाण्याचा बेत आखताय?

सध्याच्या दिवसांमध्ये हिमाचल आणि तिथं लेह भागातील बऱ्याच पर्वतरांगांचा बर्फ वितळून हा भाग पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होतो. पण, गेल्या काही वर्षांपासून इथं हवामान बदलाच्या परिभाषाच बदलताना दिसत आहेत. सध्याच्या घडीला हिमाचल प्रदेशातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास 9 जुलैपर्यंत इथं परिस्थिती काहीशी बिघडलेलीच राहील. ज्यामुळं इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या राज्यात 38 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत इथं झालेल्या पावसामुळं प्रचंड नुकसान झालं असून साधारण 306 कोटी रुपयांची वित्तहानी झाली आहे. 353 पाळील प्राण्यांचाही या पूरसदृश परिस्थितीमध्ये मृत्यू ओढावल्याची माहिती यंत्रणांनी दिली आहे.

मध्य प्ररेशातील 25 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मध्य प्रदेशात पावसाची संतताधार पाहता हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे. इथं 64 ते 115 मीमी पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.

उत्तराखंडमध्येही परिस्थिती वेगळी नाही

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे पावसामुळं नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. काही नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असल्यामुळं नजीकच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही काळापासून उत्तराखंडमधील बहुतांश भागांमध्ये होणारं भूस्खलन पाहता पावसामध्ये हा धोका आणखी वाढला आहे.

एकंदरच देशाच्या पर्वतीय भागांमध्ये पावसामुळं सध्या परिस्थिती गंभीर असून, इथं आलेल्या पर्यटकांनाही बऱ्याच गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. परिणामी सध्याच्या घडीला देशाच्या या पर्वतीय भागांना भेट देणं टाळा असं आवाहन यंत्रणा पर्यटकांना करताना दिसत आहेत. राज्यात असणाऱ्या पर्यटकांपर्यंत मदतीचा ओघ पोहोचवण्यासाठीही त्या त्या राज्याच्या यंत्रणा आपली जबाबदारी बजावताना दिसत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *