शिक्षकाच्या एका जागेसाठी आता तीन दावेदार, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी सुधारित निकष
राज्यात यापूर्वी खासगी शाळांमधील शिक्षकांच्या एका रिक्त पदावर दहा उमेदवार रांगेत होते. मात्र आता शिक्षक भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी निवड प्रक्रियेत दहाऐवजी केवळ तीनच उमेदवार मैदानात असणार आहेत.
शिक्षकाच्या एका रिक्त जागेसाठी तीनच उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
खासगी शाळांमध्ये टीईटी आणि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे उच्च गुण असलेल्या उमेदवारांपैकी एकाची निवड मुलाखतीद्वारे अंतिम करण्यात येईल, अशी तरतूद आहे. यापूर्वी शिक्षकाच्या एका जागेसाठी दहा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. मात्र आता हे प्रमाण कमी करण्यात आले आहे. मुलाखतीसाठी संबंधित शिक्षण संस्थेचा विकल्प निवडलेल्या उमेदवारांचा प्राधान्यक्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम, प्रवर्ग, विषय आदी शाळा व्यवस्थापनाच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे.
शिक्षण संस्थांनी अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे एकूण 30 गुणांच्या आधारे उमेदवाराला गुणदान करायचे आहे व त्याचा निकाल पवित्र पोर्टलवर जाहीर करायचा आहे. पवित्र पोर्टलवरील शिफारस केलेले आरक्षण विचारात घेऊन उच्च गुण असलेल्या उमेदवाराची यापुढे शिक्षक पदी निवड केली जाणार आहे.