महाराष्ट्रानंतर आता ‘या’ राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप! केंद्रीय मंत्र्याने केला दावा
महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे आणि वरच्या फळीतील नेते अजित पवार यांनी बंड केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांना वेगळी वाट करून देत त्यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ नेत्यांच्या हजेरीत अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर अजित पवारांनी दावा सांगितला. ते म्हणाले, ‘आम्ही सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढू.’ अजित दादांनी महाराष्ट्रात बंड केले असताना, आता आणखी एका राज्यातही असाच प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांनी भाजप-शिवसेना सत्ताधारी युतीशी हातमिळवणी केली. दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गेले. या दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिहारबाबत फार मोठी गोष्ट सांगितली. रामदास आठवले म्हणाले, “अजित पवार हे मातीतील नेते आहेत. राष्ट्रवादी त्यांच्यासोबत आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा खेळ आता संपलाय. महाराष्ट्रात जसे घडले, तसेच बिहारमध्येही होणार आहे.”
रामदास आठवले यांच्या विधानावर फारशी चर्चाही झाली नव्हती, तितक्यात बिहार भाजपचे अध्यक्ष सम्राट चौधरी यांनी घराणेशाही हे राष्ट्रवादीच्या फुटीचे कारण असल्याचे स्पष्ट केले. सम्राट चौधरी म्हणाले, जिथे जिथे असे नेते आहेत जे केवळ कुटुंबाला पुढे नेण्यासाठी राजकारण करत आहेत, त्या नेत्यांच्या पक्षाची आता अशीच अवस्था होणार आहे, असे सूचक वक्तव्य केले.
महाराष्ट्रासारखी परिस्थिती बिहारमध्येही होऊ शकते!
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा दावा केला. “शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादीतील बंडखोरी हे विरोधी पक्षाच्या पाटण्यातील बैठकीमुळेच झाले. राहुल गांधींना मोठे नेते प्रोजेक्ट करण्यासाठी येथे मोर्चेबांधणी केली जात होती. त्यामुळे महाराष्ट्रातील एक गट नाराज झाला. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे समजून नितीशकुमार आमदारांशी वैयक्तिकरित्या बोलत आहेत,” असे ते म्हणाले.