कोल्हापूर म्हणजे श्री महालक्ष्मीचे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्धीस आलेले तीर्थक्षेत्र. याच कोल्हापूर नगरीत असलेल्या शाहू संग्रहालयाचा संदर्भ पुस्तकात अनेकदा वाचनात आला होता. त्यामुळे या संग्रहालयाला भेट देण्याचा मोह आवरला नाही. महालक्ष्मी मंदिरापासून रंकाळामार्गे शाहू संग्रहालयाला आम्ही गेलो. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यापूर्वी संग्रहालयाचा आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परिसर, एक विस्तीर्ण उद्यान, पाण्याचे झरे तसेच राजवाड्याच्या परिसरातील खुले प्राणी संग्रहालय तेथील हरीण, सांबर, पक्ष्यांचा वेगवेगळ्या प्रजाती इत्यादी पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरतात.
कोल्हापूरातील छत्रपती शाहू संग्रहालय 1877 ते 1884 या काळात बांधण्यात आले. ब्रिटीश वास्तुविशारद ‘चार्ल्स मॅत’ यांनी ह्या संग्रहालयाचे डिझाईन केले आहे. काळ्या रंगाच्या पॉलिश केलेल्या दगडात बांधलेला हा राजवाडा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असल्याने, पर्यटकांच्या आर्कषणाचा भाग झाला आहे. या वस्तुसंग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक काचेच्यावर शाहूच्या जीवनावर आधारित घटनांची चित्र रेखाटलेली आहेत. संग्रहालयात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे फोन बंद केल्यानंतरच आत प्रवेश दिला जातो.
पॅलेसच्या तळमजल्यावर वस्तुसंग्रहालयाचे प्रदर्शन भरविले आहे. राजेशाही कुटुंबातील वेशभूषा, दागिने, किंमतीच्या वस्तू यांचा एक प्रभावी संग्रह केला आहे. शाहू महाराज यांनी शिकार करताना वापरलेल्या बंदुका, लहान मोठ्या आकाराचे भाले, बंदूक, शिकार करताना घालायचे कपडे यांचा संग्रह आपल्याला येथे पाहायला मिळतो. शाहूच्या काळातील जुनी नाणी, वंशपरंपरागत पाळणा, पलंग, बसण्यासाठीचे नक्षीदार सोफे, चित्त्यांच्या मणक्यापासून बनवलेली काठी, गेंड्याचे पाय असलेला टेबल, शहामृगाचे पाय असलेला मेणबत्ती स्टॅण्ड इ. त्यांच्या नावासहीत सुबकरीत्या मांडल्या आहेत, त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्यांना त्या वस्तूविषयी नेमकी माहिती सहज जाणून घेता येते. पुढील खोलीत शाहूंनी शिकार केलेले वाघ, जंगली कुत्रा, भालू, जंगली म्हैस, सिंह, हरीण, अस्वल यांच्यावर रासायनिक प्रक्रिया करून त्यांचे जतन करून ठेवले आहे, हे वन्य प्राणी व विदेशी पक्षी मुलांसाठी एक प्रमुख आकर्षण आहेत. ब्रिटीश व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया यांच्याशी केलेले पत्रव्यवहार यातील काही पत्र आपल्याला संग्रहालयात पहायला मिळतात. या संग्रहालयाच्या मध्यभागी अतिउच्च सुशोभित दरबार आहे, जेथे शाहूच्या काळात शासकीय, न्यायालयीन सत्रांचे आयोजन होत असे. दरबाराच्या मध्यभागी एक सिंहासन आहे, ज्यावर बसून शाहू महाराज दरबाराचे कामकाज चालवत असत. आजपर्यंत असे दरबार आपण ऐेतिहासिक सिनेमा किंवा मालिका मध्ये पाहत आलो आहे, परंतू ते प्रत्यक्षात पाहताना खूप छान वाटते.
छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या काळात चित्रकलेला विशेष महत्त्व दिले होते, त्यानुसार राजवाड्यात एक भाग दुर्मिळ चित्रकला आणि शस्त्रात्र यांनी संग्रहीत केला आहे. यामध्ये त्या काळातील स्त्रियांचा पेहराव यावरील एक तैलचित्र, शाहूंनी शिकार केलेल्या शंभराव्या वाघाबरोबरचे चित्र, हत्तीची शिकार केलेले तैलचित्र, या संग्रहालयाच्या भेटीनंतर मला असे वाटले की, शाहू महाराजाची जीवनपद्धती, त्यांची कारर्कीद या विषयी माहिती देणारा येथील वस्तूचा संग्रह आपल्या पुढील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा आहे.
संपूर्ण देशातून अनेक पर्यटक प्रत्येक वर्षी या संग्रहालयाला भेट देतात. शाहूचा इतिहास लहान मुलांना किंवा प्रौढांना प्रत्यक्षात समजून घेण्यासाठी या संग्रहालयाला भेट देणे आवश्यक आहे. इतिहासप्रेमीसाठी छत्रपती शाहू संग्रहालय अविस्मरणीय ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे