जंगल प्रत्येक ऋतूत सुंदर दिसतं असं म्हणतात. मला हा अनुभव बोरिवली पूर्वला असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाबतीत नेहमी आला आहे. पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूत मी इथं गेले आहे. कधी घरच्यांसोबत, कधी शासकीय कामानिमित्ताने. काही दिवसांपूर्वी तर मी मुलुंड गेटने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री 8 नंतर प्रवास केला. तब्बल 15 कि.मी आतून. सोबत अर्थात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी होते आणि प्रवास शासकीय वाहनातून होता. त्यामुळे दिवसा पाहिलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची रात्रीची नवलाईही अनुभवायला मिळाली.
खरं तर मुंबई महानगरामध्ये वसलेलं 103 चौ.कि.मी चं हे जंगल आत गेल्याशिवाय कळत नाही आणि एकदा आत गेलो तर आपण मुंबईत आहोत असं अजिबात वाटत नाही इतकं हे राष्ट्रीय उद्यान मनावर गारूड घालतं. हे शहरातलं जंगल आहे. शहराच्या धकाधकीच्या आयुष्यात जीवनाला मिळणारा हा समृद्ध आरोग्यदायी असा हिरवा श्वास आहे. खरं तर याला मुंबईचं फुफ्फुसही का म्हणतात हे तिथे भेट दिल्यानंतरच कळतं.
पावसात चिंब भिजत रानमेवा खात उद्यानातून फिरण्याची मजा काही औरच आहे. पावसात ठिकठिकाणी वाहणारे झरे, ओलीचिंब झाडं, पावासाच्या प्रत्येक थेंबाला स्वत:वर झेलत अडकवून ठेवणारे काटवृक्ष, धुक्यात हरवलेलं वन आणि त्यातून फार दूरवर दिसणाऱ्या मुंबईच्या ऊंच ऊंच इमारती पाहणं खुपच उत्साहवर्धक आहे. उन्हाळ्यातली पानगळ आणि वसंताचा मोहोरही इथं जाऊन एकदा तरी अनुभवावा इतकी इथली वृक्षसंपदा सुंदर आहे. राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधता विलक्षण चकित करणारी आहे.
प्राणी,पक्षी,वनस्पती
अगदी महानगराला जोडून असलेल्या या उद्यानात सुमारे 274 पेक्षा अधिक पक्षांच्या प्रजाती आढळतात. प्राण्यांच्या 35, सरपटणाऱ्या आणि उभयचर प्राण्यांच्या 78 प्रजाती आणि फुलपाखरांच्या 170 प्रजाती आढळतात. उद्यानात 1300 पेक्षा अधिक वृक्ष प्रजाती आहेत. मुंगूस, उदमांजर, रानमांजर, अस्वल, लंगूर अशा प्राण्यांचा येथे संचार असतो. या उद्यानात हजारो प्रकारचे वृक्ष आहेत. त्यात मुख्यत: करंज, साग, शिसव, बाभूळ, बोर, निवडुंग, बांबूची बेटं आपल्याला पहायला मिळतात.
केयूबी
इथला केयूबी हा असा विभाग आहे ज्यात पर्यटनासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा आहेत आणि एसजीएनपीच्या (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) कामाकाजाच्या वेळेत हा विभाग जनतेसाठी खुला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुलसी तलाव याच जंगलात आहेत. मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली असली तरी या जंगलाचा इतिहास फार जुना आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलाला इ.स.पूर्व चौथ्या शतकापासूनचा खूप प्राचीन इतिहास असल्याचे वनाधिकारी सांगतात. पार्कच्या मध्यभागी बौद्धकालीन कान्हेरी गुंफा आहेत. हे बौद्धकालीन महत्वाचे शिक्षण आणि तीर्थक्षेत्र होते असं म्हणतात. बौद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व 9 व्या शतकापासून ते इस. पूर्व 1 शतकापर्यंत त्याचे कोरीव काम केले अशी माहिती देखील इथं मिळते. या संरक्षित वास्तुशिल्पात 100 पेक्षा अधिक गुंफा आहेत. ज्या ज्वालामुखीपासून निर्माण झालेल्या दगडात कोरलेल्या आहेत. कान्हेरी हा शब्द कृष्णगिरी या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ काळा पर्वत. बौद्ध आणि बोधिसत्व यांच्या अप्रतिम मूर्तीचे अवशेष इथं पहायला भेटतात.
बिबट्यांचे देखील घर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जंगल हे मुक्त विहार करणाऱ्या बिबट्यांचे देखील घर आहे. इतर प्राण्यांप्रमाणे माणसांनी निर्माण केलेल्या सीमारेषा बिबट्यांना समजत नाहीत म्हणून खबरदारीचे सर्व उपाय करणे हे आपल्याच हातात असल्याचे सांगतांना बिबटे आणि इतर वन्यजीवांच्या बाबतीत आपण सतत सतर्क राहावे, नियमांचे पालन करावे अशा सूचना उद्यानात जागोजागी लिहिलेल्या दिसतात. या मार्गदर्शन आणि प्रयत्नांमुळेच मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटनांवर आळा घालणे उद्यान प्रशासनाला शक्य झाले आहे.
वनाचा आनंद घेत सुरक्षित वन पर्यटन कसे करावे याचे सुंदर मार्गदर्शन इथल्या निसर्ग माहिती केंद्रातून मिळते. या केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. जसे रात्रीचे शिबीर, कार्यशाळा, निसर्ग भ्रमंती सहल, पक्षीनिरिक्षण, फुलपाखरू निरिक्षण इ. पर्यटकांना निसर्गाचा समृद्ध अनुभव देण्यासाठी उद्यानातील तंबू संकुलामध्ये आरामदायी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यात कुटुंबासाठी तंबू आणि डॉर्मिटरीजची व्यवस्था उपलब्ध आहे. निसर्ग केंद्राशी संपर्क साधून हे तंबू भाड्याने घेता येतात. दहा किंवा अधिक व्यक्तींसाठी रात्रीच्या शिबीराचे आयोजन करता येते.
सकाळी 7.30 ते सायंकाळी 6.30 या कालावधीत उद्यान पर्यटकांसाठी खुलं असतं. राष्ट्रीय उद्यानात तुम्हाला फिरायचे असेल तर उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सायकल भाड्याने मिळते. मुख्य प्रवेशद्वारापासून अगदी हाकेच्या अंतरावर एक कृत्रिम तलाव आहे. ज्यात पेडल बोटचा आनंदही आपण घेऊ शकतो. गांधी टेकडी ही महात्मा गांधीजींचे स्मृतिस्थळ ही इथे आहे. इथून सभोवतालच्या जंगलाचे सुंदर दृष्य पाहाता येते
वनराणी
वनराणी ही या जंगलाची राणी असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे हे सर्वात जुने आकर्षण आहे. अरूंद मार्गावरून धावणारी ही झुक झूक गाडी गांधी टेकडीच्या सभोवतालच्या टेकड्यांमधून वाट काढत आपल्याला जंगल पर्यटनाचा मनसोक्त आनंद देऊन जाते.
इथं फुलपाखरू आणि सुगंधी वनस्पती उद्यानही साकारण्यात आले आहे. शिवाय सिंह आणि व्याघ्र सफारी हे पर्यटकांचे वाढते आकर्षण केंद्र झाले आहे. सुरक्षित बंदिस्त वाहनातून वाघ आणि सिंहाना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा थरार मुंबईत राहून अनुभवण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळाली आहे. या उद्यानास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील बोरीवली हे स्थानक जवळचे आहे. तेथुन उद्यानाकडे जाण्यासाठी बस व रिक्षा सहज उपलब्ध आहेत.एखादा रविवार किंवा सुट्टीचा दिवस कुटुंबियांसमवेत घालवायचा असेल तर हे उद्यान अतिशय योग्य निवड ठरेल.