प्राचीन काळापासून समाज पुरुषप्रधान आहे. महिलांना त्यांच्याच कुटुंबाकडून आणि समाजाकडून अनेक कारणांनी दडपण्यात आले. कुटुंबात आणि समाजात त्यांच्यावर अनेक प्रकारचा हिंसाचार आणि लिंगभेदाला सामोरे जावे लागत असे.
अशाच समाजात एक कणखर, निर्भीड, हिम्मतवान, संवेदनशील, स्वाभिमानी, लढवय्यी स्त्री जन्माला आली.
या महान स्रीने या देशाची शोभा वाढवली. त्यांचे नाव घेतल्यावर आपली मान अभिमानाने ताठ होते. त्या म्हणजे राजमाता जिजाऊ! त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी ‘विजयवर्धिनी जिजाऊ’ या चित्रमय पुस्तकातून मांडला आहे. जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू लेखकांनी मांडले आहेत. जिजाऊंच्या ३५० व्या स्मृतिदिनानिमित्त हे पुस्तक प्रकाशित करत असल्याचे कोकाटे यांनी स्पष्ट केलंय.
जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे नामवंत आणि पराक्रमी सरदार लखुजीराजे जाधवराव यांच्या घरात झाला. आई म्हाळसाबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. जिजाऊंचे आई-वडील अत्यंत धोरणी दूरदृष्टीचे शूर आणि पराक्रमी होते. ते अत्यंत प्रगल्भ विचारांचे होते. मुलगी देखील मुलाप्रमाणेच हिम्मतवान, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असते असा त्यांचा विचार होता.
वडील लखुजीराजे जाधवराव आणि आई म्हाळसाबाई यांनी जिजाऊंना लहानपणापासूनच युद्ध कला आणि राजनीतीचे शिक्षण दिले. त्यांनी जिजाऊंना मुलाप्रमाणेच दांडपट्टा फिरविणे, तलवार चालविणे, घोड्यावर बसणे, लुटूपुटूची लढाई करणे, राज दरबारात सहभाग घेणे, पोहणे, झाडावर चढणे, चर्चेत सहभाग घेणे अशा प्रकारचे शिक्षण दिले. मुलींना संधी दिली तर जिजाऊसारख्या इतिहास निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रिया निर्माण होऊ शकतात. असे विचार लेखक डॉ.कोकाटे आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून समाजापुढे मांडतात.
जाधवरावांच्या कन्या या भोसले कुळाच्या महाराणी झाल्या. शहाजीराजे- जिजाऊ यांचा विवाह मोठ्या आनंदाने साजरा झाला. शहाजीराजे- जिजाऊ यांचा सुखी संसार सुरू होता शहाजीराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा, राजनीतीचा, स्वाभिमानाचा जिजाऊंना प्रचंड अभिमान वाटायचा. त्या त्यांना नेहमी प्रेरणा देत असत. जिजाऊ स्वतः युद्धकला आणि राजनीतीमध्ये निपुण होत्या.
ज्यांची आई युद्धकलेत निपुण आहे, त्यांना बाह्य शिक्षकाची गरज नव्हती, या महात्मा फुले यांच्या पोवाड्याचा उल्लेख कोकाटे करतात. याला परमानंदाच्या शिवभारत या ग्रंथात पुष्टी मिळते. छत्रपती शिवरायांना म्हणजेच शिवबांना उदात्त जीवन प्रेरणा जिजाऊंनी दिली. त्याचबरोबर भारतीय परंपरेचे शिक्षण जिजाऊंनी शिवबांना दिले.
जिजाऊ या स्वतः प्रचंड ज्ञानी होत्या. त्यांचा व्यासंग खूप दांडगा होता. त्या बहुश्रूत होत्या. आपल्या वैभवशाली परंपरेचा अभिमान त्यांनी शिवबाला शिकविला. त्यांनी भारतातील महामानवांच्या प्रेरणादायक गोष्टी सांगितल्या. त्यांनी शिवबांच्या ठायी स्वाभिमान, धैर्य, शौर्य,आत्मविश्वास आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली.
जिजाऊ या निर्भीड होत्या, कणखर होत्या, हिम्मतवान होत्या, संकटसमयी त्या लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागेल, रणांगण गाजवावे लागेल, चातुर्य पणाला लावावे लागेल, हे त्यांनी ओळखले होते. जपमाळ आणि नामजप करून स्वराज्य स्थापन करता येणार नाही, हे वास्तव ओळखणाऱ्या जिजाऊ प्रागतिक विचारांच्या होत्या. याची अनेक उदाहरणे डॉ. कोकाटे या पुस्तकातून आपल्यासमोर मांडतात.
अफजलखानाला भेटण्यापूर्वी शिवाजीराजे जिजाऊंचा आशीर्वाद घेण्यासाठी राजगडावर गेले. तेव्हा जिजाऊ म्हणाल्या “शिवबा तू अफजलखानाच्या भेटीत जा तुझा विजय निश्चितपणे आहे परंतु जर काही दगा फटका झालाच तर शंभू बाळास गादीवर बसून मी राज्यकारभार करेल. जा लढ मी तुझ्या पाठीशी आहे.” असा आशीर्वाद जिजाऊंनी दिला. तसेच पन्हाळ्याच्या वेढ्यात शिवाजीराजे अडकले होते.
पावसाळ्याचा दिवस होते. शिवरायांच्या सुटकेसाठी नेताजी पालकर प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. परंतु सिद्दीने कडकपणे बंदोबस्त लावला होता. बाहेर पडण्याची शक्यता दिसत नव्हती. पुण्याच्या दिशेने शाहिस्तेखान आलेला होता. तेव्हा शिवरायांची सुटका होणे स्वराज्यासाठी अत्यावश्यक होते. अशावेळी जिजाऊंनी शिवरायांच्या सुटकेचा निर्धार केला.
स्वतः तलवार हातात घेऊन पन्हाळगडावर चालून जाण्याचा व शिवरायांची सुटका करण्याचा निर्धार केला.” आत्ता जाते त्या सिद्दीचा पराभव करते आणि शिवबाला सोडवून आणते असे त्या नेताजी पालकरांना म्हणाल्या.” हा प्रसंग समकालीन परमानंदाने शिवभारत या ग्रंथात विस्ताराने मांडला आहे. जिजाऊ युद्धकलेत निपुण असल्याचा हा समकालीन पुरावा लेखक देतात.
पुस्तकातील चित्रे अत्यंत बोलकी आहेत. अत्यंत आकर्षक, प्रसंगानुरूप प्रभावी चित्रे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्ये आहे. भाषा अत्यंत सुलभ आणि प्रभावी आहे. पुस्तकातील आशय वाचनीय आहे. तरुण पिढीसाठी पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. मुलींना प्रेरणा देणारे पुस्तक आहे. मुलगी इतिहास घडविते. मुलाप्रमाणे मुलगीही वंशाचा दिवा असते, ही भावना दृढ करणारे हे पुस्तक आहे. मध्ययुगीन काळात पुरुषांनादेखील प्रेरित करण्याचे सामर्थ्य महिलांत होते, महिलादेखील गुरू, मार्गदर्शक होत्या, हा संदेश हे जिजाऊ चरित्र देते.