बिग ब्रेकिंग : राष्ट्रवादीत फूट! अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही भगदाड पाडण्यात भारतीय जनता पक्षाला अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह गळाले लागले आहेत.
राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा आज ( दि. २ ) शपथविधी होणार असून, अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राजेश टोपे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या व्यतिरिक्त सर्वच नेते उपस्थित होते. त्यामुळे लगबगीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनीही देवगिरी गाठले होते. मात्र, सुप्रिया सुळे पोहचण्याआधीच राष्ट्रवादीचा खेळ खल्लास झाला होता. याबाबतची माहिती सुळे यांना कळताच त्यांनी देवगिरी सोडले.
देवगिरीवर हा फाटाफुटीचा खेळ सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जोरदार खलबते सुरू होती. देवगिरीवरील बंड यशस्वी झाल्याचा संदेश मिळताच राजभवनवर शपथविधीची तयारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री म्हणून आज अजित पवार यांच्यासह भुजबळ यांचाही शपथविधी होणार आहे.