ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

‘राजे.. तुम्ही या रायगडावर बसून प्रजेला न्याय दिला, परंतु..’; सत्तेसाठी महाराजांचं नाव घेणाऱ्यांवर शेट्टींचा प्रहार


छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या गवताचेही महत्त्व ओळखून त्यांना सुखी ठेवण्याचे धोरण राबवले.

रायगड : ‘केंद्र आणि राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यकर्ते सत्ता उपभोगत आहेत, त्यांना शिवरायांच्या विचारांचा विसर पडला आहे.

या सरकारचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी तीन महिने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात गावोगावी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान राबविणार आहे. याची सुरुवात किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन करत आहे, असं राजू शेट्टी  यांनी स्पष्ट केलं.

तीन महिन्यानंतर राज्यव्यापी आंदोलनातून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जेरीस आणू ,’ असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानाचा प्रारंभ किल्ले रायगड येथे शनिवारी (ता.१) झाला.यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘राज्यातील शेतकऱ्यांना ऊस, कापूस आणि सोयाबीनच्या नफ्या-तोट्याचे गणित माहितीपुस्तक आणि सभांद्वारे समजावून सांगणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या गवताचेही महत्त्व ओळखून त्यांना सुखी ठेवण्याचे धोरण राबवले, मात्र त्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण राबवले आहे.

शेतकरी महसूल देत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. उलट शेतकऱ्याच्या जीवावरच सगळे उद्योगधंदे चालतात आणि सरकारला महसूल मिळतो. यामुळे शेतकऱ्याला लाभदायी धोरण राबवण्याची गरज आहे. सरकारला वस्तुस्थिती दाखवण्यासाठी आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे.’

दरम्यान, किल्ले रायगड परिसरात प्रचंड पाऊस असतानाही स्वाभिमानीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जालंदर पाटील, महेश खराडे, तात्या बालवाडकर, पोपटराव मोरे, पूजा मोरे, वैभव कांबळे, सुभाष शेट्टीअमर कदम, संदीप जगताप आदींसह राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवरायांना साकडे..

‘राजा, तुम्ही या रायगडावर बसून प्रजेला न्याय दिला; परंतु आजचे राज्यकर्ते आपले नाव फक्त सत्ता उपभोगण्यासाठी वापरत आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी आजपासून हे जागृती अभियान सुरू करीत आहोत. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही शेतकरी प्रजेला सूज्ञ करण्यासाठी रायगडावरून सुरुवात करीत आहोत,’ असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सदरेवरील पुतळ्यासमोर शेट्टी यांनी कैफियत मांडून राज्यकर्त्यांना सुबुद्धी द्यावी, असे साकडे घातले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *