सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस; शेतकरी समाधानी; शेतीच्या कामांना वेग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार सुरवात झाल्यानंतर बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. जोरदार पाऊस नसला तरी समाधानकारक पावसाने सुरवात झाल्याने भातशेती लागवडीच्या कामांनी जोर धरला आहे. जिल्हयातील मुख्य पीक असलेलेल्या भात लागवडीसह काही भागात भिजवणीच्या भातशेतीची लावणीला सुरवात झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणजे भात पीक होय. परंतु पावसाने उशिरा का होईना सुरवात केल्यानतंर पेरणीच्या कामांना मागील आठवड्यांपासून वेग आला आहे. मिरगापासून मान्सून जिल्ह्यात म्हणावा तसा सक्रीय झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र जून अखेरपासून भातशेतीस अनुकूल पाऊस पडू लागल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. यामुळे भात लागवडीचे काम करण्यासाठी शेतकरी शेतात उतरला आहे.
जिल्हयातील जागोजागी भातलागवडीची कामे करत असणारा शेतकरी वर्ग दिसून येत आहे. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे मे अखेरीस काही भागात भिजवणी करून भात पेरणी केलेली होती. त्यामुळे तेथील भातशेती (तरवा) चांगला आल्याने काही भागात लावणीच्या कामांना वेग आला आहे. तर काही ठिकाणी उशिरा पाऊस झाल्याने येथील पेरणीची कामेही पूर्ण झालेली आहेत. यामुळे उशिरा सक्रीय झालेला मान्सून सध्यस्थितीत भात पिकास योग्य असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.