”वीजग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी मुख्यालयाकडून दैनंदिन आढावा घेतला जात आहे. त्यामुळे ग्राहकांकडून प्राप्त कोणत्याही तक्रारींचे निराकरण तत्परतेने झाले पाहिजे. सोबतच वीजबिलावरील नावात बदल किंवा दुरुस्तीच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी.
यात हेतुपुरस्सर हयगय आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी शुक्रवारी (ता. ३०) झालेल्या आढावा बैठकीत दिला.
पुणे परिमंडलांतर्गत वीजग्राहकांच्या तक्रारींचे निवारण, सुरळीत वीजपुरवठा, वीजबिल वसुली, वीजहानी आदी मुद्द्यांवर येथील रास्तापेठ कार्यालयात आढावा घेताना संचालक श्री. ताकसांडे बोलत होते. यावेळी प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची उपस्थिती होती.
संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की अचूक बिलिंगसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वीजग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. मात्र बिलिंगसह इतरही विविध तक्रारींची दखल घेत तत्परतेने त्याचे निराकरण करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यासाठी स्थानिक यंत्रणेने अधिक संवेदनशील व सजग राहिले पाहिजे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्यास ते खपवून घेतले जाणार नाही.
वीजपुरवठा खंडित झाल्यास तो कमीतकमी कालावधीचा राहील यासाठी विशेष प्रयत्न करावेत. वीजयंत्रणेद्वारे पर्यायी व्यवस्था करावी. खंडित वीजपुरवठ्याबाबत देखील मुख्यालयाकडून गांभीर्याने आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे वीजयंत्रणेत बिघाड होणार नाही याची खबरदारी घ्यावी व आवश्यक उपाययोजना कराव्यात. सोबत नियमाप्रमाणेच वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे करावी, असे संचालक श्री. ताकसांडे यांनी स्पष्ट केले.नवीन वीजजोडण्यांसाठी पुणे परिमंडलामध्ये मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडण्यांची प्रक्रिया अधिक वेगाने करण्याची सूचना संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी केली. दरमहा चालू वीजबिलांच्या १०० टक्के वसुलीसह मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या थकबाकी वसुलीचे देखील उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे.
पुणे परिमंडलामध्ये वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यास त्याची जबाबादारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक वीजवाहिनीचे नियमित ऊर्जा अंकेक्षण व पडताळणी करून वीजहानी कमी करण्याचे उपाय करावेत, अशी सूचना संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी यावेळी केली.
या बैठकीला अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. संजीव राठोड (प्रभारी), डॉ. सुरेश वानखेडे यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.