वारकरी पंथाचे कार्य सामाजिकदृष्टय़ा निश्चितच व्यापक आणि मौलिक स्वरूपाचे आहे. निकोप जीवनदृष्टीचा पाया खणून संतांनी त्यावर सामाजिक कार्याचे मंदिर उभारले.
ज्ञानेश्वर – एकनाथांच्या – तुकोबांच्या ग्रंथांनी या पंथाला तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिल्यामुळे वारकरी पंथाचे महत्त्व द्विगुणित झाले. वारकरी पंथाद्वारे संतांनी विघटित आणि त्रस्त समाजाला एक नवीन संबल प्रदान करून साऱया विश्वाला त्याद्वारे ज्ञानरूपी प्रकाशात आलोकित केले. म्हणूनच 800 वर्षांनंतर आजही वारकरी पंथाचे महत्त्व टिकून आहे. वारकरी पंथाला मरण नाही, हा एक अक्षय संप्रदाय आहे.
वारकरी पंथाच्या सामाजिक कार्याला खरी सुरुवात झाली ती तेराव्या दशकापासून. सर्व दिशांनी आलेल्या साऱया प्रवाहांना सामावून घेणारा असा हा वारकरी पंथ आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारसरणीवर नाथ पंथातील तत्त्वज्ञानाचा ठसा आहे. कारण गुरू परंपरेने ते नाथ पंथीय होते. याबरोबरच शांकर वेदांत आणि कश्मिरी शैवमत यांचे संस्कार त्यांच्यावर होते. त्यामुळे शैवांची निष्ठा आणि तपश्चर्या त्यांनी स्वीकारली. वैष्णव संप्रदायातील सात्त्विकता, विश्वबंधुत्व, दयाशीलता असे अनेक गुण त्यांनी उचलले होते. द्वारकेचा कृष्ण आणि पंढरीचा विठ्ठल, दोन्ही दैवते शेजारच्या प्रदेशातून इकडे आली. गुजरातचे भक्तिमार्गाचे संस्कार अशा सर्व प्रवाहांना मिळून महाराष्ट्रात त्यांनी एक नवी सुष्लिष्ठ प्रेरणा निर्माण केली. हे सर्व संग्राहक उपासना पीठ आहे. सगळ्या पंथांतील संस्कारक्षम आणि चिंतनशील भक्तीचे हे सांस्कृतिक पेंद्र आहे. जाती व्यवस्थेला धक्का न लावता गरीब-श्रीमंत, उच्च-नीच हा भेदभाव विसरून सर्वांना येथे स्थान प्राप्त झाले आहे.
ईश्वराजवळ भेदभाव नसतो, पण त्यावेळी कर्मठ रूढीमुळे अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. कर्मठ लोकांनी अस्पृश्यांवर ही बंधने लादली होती. वारकरी पंथाने लोकांमध्ये समतेचे आणि ममतेचे संस्कार केले. हजारो शूद्रातिशूद्रांना बंधुभावाचे शिक्षण दिले. त्यांना आत्मोद्धाराचा मार्ग दाखवला. लोकांमध्ये श्रद्धा होतीच. संतांनी त्याला डोळसपणा आणला. संकुचित सांप्रदायिकता त्यांनी कधीही बाळगली नाही, दैवतांची रणे माजवली नाही की विशिष्ट प्रकारच्या प्रतीकांचा आग्रह धरला नाही. बौद्ध, जैन, लिंगायत यांच्याबरोबरच लोकभाषेचाही पुरस्कार केला. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा देशभाषेत लिहिलेली वाचायला सोपी, विस्तृत आणि स्फूर्तिदायक आहे. लोकांना समजेल, रुचेल, पचेल अशा तऱहेचे लेखन या संतांनी केले. लोकभाषा मराठीचा अभिमान बाळगला आणि सर्वसामान्यांची भाषा मराठीला साहित्यात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले.
माणसाचे मोठेपण हे त्याच्या सामाजिक प्रतिष्ठsवर अवलंबून नसून वैयक्तिक चारित्र्यावर आहे ही गोष्ट त्यांनी पुनः पुन्हा आवर्जून सांगितली. सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेला बहुजन समाजातील न्यूनगंड नाहीसा करून त्यांच्या प्रगतीला उपकारक होतील अशी नवी मूल्ये आचरणात आणण्याचा संतांचा प्रयत्न होता. वारकरी संतांनी भक्तीला अग्रस्थान दिले होते हे जरी खरे असले तरी ज्ञानालाही त्यांनी तितकेच महत्त्व दिलेले होते. नामदेवांची परीक्षा करून त्यांचे ‘मडके’ कच्चे असल्याची साक्ष गोरोबा काकांकडून काढून नामदेवांच्या भक्तीला ज्ञानाची जोड देण्याचे काम ज्ञानदेवांनी केले. विसोबा खेचरांचा अनुग्रह झाल्यानंतर ‘डोळियांचे डोळे, उघडले जेणे’ या नामदेवांच्या उद्गारावरून वारकरी संप्रदायात ज्ञानाचे महत्त्व किती आहे हे स्पष्टपणे दिसून येते.
वारकरी संतांनी केवळ धार्मिक क्षेत्रातील भेदभाव दूर केला. देव भावाचा भुकेला आहे ही भावना त्यांनी सर्वसामान्य जनमनात खोलवर रुजवली. आपण सर्वच ईश्वराची लेकरे आहोत ही विश्वबंधुत्वाची भावना अंगी बाणवली. त्यामुळे सामाजिक व्यवहारातील कटुता पुष्कळ अंशी कमी झाली. देवळातील देव न बघता माणसातील देव त्यांनी पाहिला आणि सर्वांना दाखविला ही या पंथाची विशेषता आहे. तुकाराम महाराज आपल्या अभंगात हा विचार सुंदरपणे मांडताना दिसतात – ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा!’
समाजघटनेच्या दृष्टीने माणसाचा आत्मविश्वास वाढवून त्याला कर्माकडे प्रवृत्त करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वारकरी पंथाने केले. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. जातीभेद हा नैसर्गिक आहे. तेव्हा मोठेपणाने त्याचा स्वीकार करून सर्व जातीच्या लोकांना निरहंकारपणे स्वधर्माचे पालन करण्याचे धडे त्यांनी दिले. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे. जातीभेद विरहित मानवतेच्या शिकवणीचा प्रसार व प्रचार करणाऱया वारकरी संप्रदायाला अनेक थोर संतांची परंपरा लाभली आहे. या संप्रदायातील संतांनी वेगवेगळ्या कालावधीत जन्म घेऊन वेळोवेळी तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत लोकांचे प्रबोधन केले. वारकरी संतांची प्रवृत्ती लोकाभिमुख होती. दिवसरात्र बहुजन समाजात राहून नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला व प्राप्त परिस्थितीला कणखरपणे सामोरे जाण्याचे बळ त्यांच्यात निर्माण केले. या संप्रदायाने प्रपंच आणि परमार्थाचा समन्वय साधला आहे. एकनाथ महाराज, गोरा पुंभार, चोखा मेळा, सावता माळी असे अनेक संत गृहस्थाश्रमी, कुटुंब वत्सल होते. आपापले व्यवसाय निर्वेधपणे सांभाळत ते लोकांत मिसळत होते. निष्ठा, त्याग, धैर्य, सहिष्णुता, उदारता इत्यादी गोष्टींनी त्यांनी लोकांची मने जिंकली होती. आत्मशुद्धी आणि सदाचार यावर वारकरी पंथाने भर दिलेला आहे.
‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे’… जगाच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी, सुखासाठी आपले सर्व आयुष्य ओवाळून टाकणं हेच वारकरी संतांचे उद्दिष्ट होतं. मानवतावादी विचारधारा हीच त्यांना प्राधान्याने अभिप्रेत होती. धनसंपत्तीपेक्षा माणूस आणि त्याचे जीवन हे सर्वाधिक मोलाचे असते हा विचार त्यांनी समाजाला दिला. भौतिक संपत्तीपेक्षा वैचारिक आणि आत्मिक संपत्ती जास्त श्रेष्ठ असते ही शिकवण वारकरी संतांनी समाजाला दिली. या पंथात उपासकांची भावनाच मुख्य आहे, प्रतिमा गौण आहे याची जाणीव असल्यामुळे वारकरी संतांनी ऐक्यावर अधिक भर दिलेला दिसून येतो.
वारकरी पंथाचे कार्य सामाजिकदृष्टय़ा निश्चितच व्यापक आणि मौलिक स्वरूपाचे आहे. निकोप जीवनदृष्टीचा पाया खणून संतांनी त्यावर सामाजिक कार्याचे मंदिर उभारले. ज्ञानेश्वर – एकनाथांच्या – तुकोबांच्या ग्रंथांनी या पंथाला तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिल्यामुळे वारकरी पंथाचे महत्त्व द्विगुणित झाले. वारकरी पंथाद्वारे संतांनी विघटित आणि त्रस्त समाजाला एक नवीन संबल प्रदान करून साऱया विश्वाला त्याद्वारे ज्ञानरूपी प्रकाशात आलोकित केले. म्हणूनच 800 वर्षांनंतर आजही वारकरी पंथाचे महत्त्व टिकून आहे. वारकरी पंथाला मरण नाही, हा एक अक्षय संप्रदाय आहे.