महापालिकेवर हल्लाबोल करण्यासाठी शिवसैनिक सज्ज; 1 जुलैच्या एल्गाराची जोरदार तयारी
मुंबईकरांच्या कष्टाच्या हजारो कोटी रुपयांवर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मिंधे सरकारने दरोडा घातला. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिक महापालिका मुख्यालयावर येत्या 1 जुलै रोजी हल्लाबोल करणार आहेत.
भ्रष्टाचारी महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहेत. गगनभेदी घोषणांचा प्रचंड मारा यावेळी महापालिकेवर आणि मिंधे सरकारवर होणार आहे. या एल्गारासाठी प्रत्येक शिवसैनिक आणि नागरिक उत्सुक असून तशी सज्जताही त्यांनी केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. मिंध्यांविरुद्ध मुंबईकरांच्या मनात निर्माण झालेला असंतोष या मोर्चातून प्रकट होणार आहे. मोर्चाचा टीझरही शिवसेनेकडून नुकताच लाँच करण्यात आला. त्यात मिंध्यांच्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचण्यात आला आहे.
शिवसेनेच्या टीझरमध्ये मुंबई महानगरपालिकेत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला गेला आहे. रस्ते घोटाळा, खडी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, सॅनिटर पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा, टेंडर घोटाळा अशा एक ना अनेक घोटाळय़ांनी मिंध्यांचे हात बरबटले आहेत. महापालिका आयुक्तही मिंध्यांचे मिंधे झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी अनेकदा या घोटाळय़ाबद्दल महापालिका आयुक्तांना पत्रे पाठवून प्रश्न विचारले, परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर देण्याचे सौजन्य त्यांनी दाखवलेले नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे. आता मोर्चाद्वारेच त्यांच्यावर हल्लाबोल केला जाणार आहे.