राजू शेट्टी यांच्यासह २१ जणांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय..जाणून घ्या
जयसिंगपूर : विधानभवनावर तूर, दूध, कांदा व कापूस फेकून सरकारचा निषेध केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
शेट्टीसह सर्वांचे गिरगाव न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ७ मार्च २०१७ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे आंदोलन करण्यात आले होते.
२०१७ साली राज्यातील तूर, कांदा, दूध, कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. वरील पिकांचे दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत होत्या. केंद्र व राज्य सरकारने फक्त घोषणाच केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २०१७ साली विधानभवनावरती अर्थसंकल्पीय अधिवेशनात तूर, कांदा, दूध फेकून शासनाचा निषेध करून आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सरकारकडून राजू शेट्टी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हा गुन्हा गिरगाव न्यायालयात सुरू होता. सहा वर्षांनंतर न्यायालयाने या गुन्ह्यातून शेट्टी यांच्यासह सतीश भय्या काकडे, प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, रवी मोरे, हंसराज बडगुले, प्रकाश बालवडकर, अमर कदम, जे. पी. परदेशी यांच्यासह २१ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली. या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कामकाज ॲड. संदीप कोरेगावे व ॲड. प्रवीण मेंगाने यांनी केले.