जलजीवनच्या कामांची खातेप्रमुखांकडून तपासणी, नगर जिल्ह्यात ९०० गावांत कामे प्रगतिपथावर
अहमदनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांबाबत तक्रारी झाल्याने या कामांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची नेमणूक करण्यात आली.
दोन दिवस तपासणी केल्यानंतर सोमवारी या खातेप्रमुखांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे अहवाल सादर केला.
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत राज्यातील अनेक गावांत पाणी योजनांची कामे सुरू आहेत. नगर जिल्ह्यात पाणीपुरवठा विभागाकडून ८५० कोटी रुपये खर्चाच्या पाणी योजनांची कामे ९०० गावांमध्ये केली जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही मोहीम सुरू असली तरी यातील बहुतांश कामे गेल्या वर्षभरात मंजुरी मिळून सुरू झालेली आहेत. सध्या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन कामे सुरू आहेत. परंतु या कामांबाबत अनेक तक्रारी सध्या जिल्हा परिषदेकडे येत आहेत. निविदा प्रक्रियेतील अनियमिततेसह सुरू असलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या या तक्रारी आहेत. दरम्यान, मध्यंतरी अशाच तक्रारीमुळे राज्य सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या संचालनालयाने या कामांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.
दरम्यान, कामांच्या निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्ष कामात काही त्रुटी राहू नयेत किंवा गावांतील लोकांची योजनेबद्दलची मते जाणून घेण्यासाठी ही तपासणी करण्यात येत असल्याचे सीईओंचे मत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील काही कामांना भेटी देऊन तेथील तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांची नेमणूक करण्याचा निर्णय सीईओ येरेकर यांनी घेतला. त्यानुसार या विभागप्रमुखांनी शनिवार (दि. २४) व रविवार (दि. २५) असे दोन दिवस कामांची पाहणी केली. त्याचा अहवाल दि. २६ रोजी येरेकर यांना विभागप्रमुखांनी सादर केला. आता या अहवालात नेमके काय आढळले, हे गुलदस्त्यात आहे. कामांचा दर्जा खरंच निकृष्ट आहे की केवळ राजकीय श्रेयवादातून या तक्रारी झाल्या आहेत, या बाबी आता अहवालातूनच समोर येणार आहेत.
अधिकाऱ्यांसोबत एक उपअभियंता
जिल्ह्यातील १४ तालुक्यांसाठी जिल्हा परिषदेचे १४ विभागप्रमुख विविध तालुक्यांत या कामांची तपासणी करण्यासाठी गेले. बांधकामासह पाईप व इतर साहित्याच्या दर्जा, पाणी योजनेचे स्त्रोत ही पाहणी करण्यासह गावातील लोकांची मते अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. दरम्यान, यातील काही बाबी तांत्रिक असल्याने त्याबाबतची माहिती देण्यासाठी या अधिकाऱ्यांसोबत पाणीपुरवठा विभागातील एकेका उपअभियंत्याची नेमणूक करण्यात आली होती.