येथील उपजिल्हा रूग्णालयात शनिवारी जिल्हा सामान्य रूग्णालयाचा प्रभार नुकताच स्वीकारलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोलंकी यांनी व्यवस्थेच्या पाहणीकरीता भेट दिली.
ही संधी साधत येथील पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने डॉ. सोलंकी यांची भेट घेत त्यांना येथील प्रलंबीत समस्या निदर्शनात आणून दिल्या व त्या मार्गी लावाव्या, अशी मागणी केली.
50 खाटांची क्षमता असलेल्या येथील उपजिल्हा रूग्णालयातील अनेक वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे सेवा बजावत असल्याने येथील आरोग्य व्यवस्था बिघडलेली आहे. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे येथील बाह्य रूग्ण विभागात एमबीबीएस डॉक्टरची सेवा उपलब्ध होत नाही. कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या साहायानेच येथील कारभार चालत आहे. त्यामुळे दर्जेदार आरोग्य सेवा रूग्णांना मिळत नाही. स्थानिक स्तरावरच उपचाराची सूविधा असतानाही क्षुल्लक करण्याकरीता रेफर टू गडचिरोली हा प्रकार वाढलेला आहे. यामुळे रूग्ण व त्यांच्या कूटूंबियांना अधिकचा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. रूग्णालयात ट्रामा सेंटर मंजूर आहे. मात्र आवश्यक जागा व प्रशासकीय लालफीतशाहीत अडकलेला हा उपक्रम तातडीने क्रीयान्वीत करण्यात यावा. तसेच कोट्यवधी रूपये खर्च करीत सती नदीच्या काठावर बांधकाम करण्यात आलेली आरोग्य कर्मचारी वसाहत असून तिथे अद्याप पाण्याची उपलब्धता होत नसल्याने मागील तिन ते चार वर्षापासून धूळखात पडून आहे. येथे पाण्याच्या उपलब्धतेकरीता तातडीने प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करीत प्रश्न मार्गी लावण्यात यावा इत्यादी मागण्यांकरीता शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे चर्चेद्वारे तगादा लावला व सर्व प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
यावेळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीत ठमके उपस्थित होते शिष्टमंडळात भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक अॅड उमेश वालदे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रविंद्र गोटेफोडे, सामाजिक कार्यकर्ते विलास गावंडे, रूग्ण कल्याण समिती सदस्य विवेक निरंकारी, रूग्ण कल्याण समीती सदस्य सिराज पठान, वैभव बंसोड यांचा समावेश होता.