देशातील रस्ते अमेरिकेपेक्षा सुसज्ज करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा
मुंबई : भारताची अर्थव्यवस्था आणि वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकावर जाईल, असे प्रतिपादन करीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महाराष्ट्रातील तर सोडाच, पण उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रस्तेही २०२४ पर्यंत अमेरिकेतील रस्त्यांपेक्षाही चांगले होतील, असा दावाही त्यांनी केला.
परिवहन विभागातील (आरटीओ) भ्रष्टाचार संपला असून सागरी विमानाने मुंबईतील समुद्रातून उडून जयपूरच्या तलावात आणि तेथून कोलकात्यालाही जाता येईल, हे दिवसही आता फार दूर नसल्याचे गडकरी यांनी नमूद केले. मुंबई महापालिकेने सर्व विद्युत बसगाडय़ा चालविल्या, तर सध्याच्या एकतृतीयांश तिकीटदरातही नफा कमावता येईल, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीचे विवेचन करताना गडकरी यांनी मोदी सरकारची अर्थनीती, स्वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेस सरकारचे आर्थिक धोरण आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून देशाने केलेली प्रगती याचा सविस्तर आढावा घेतला.
गडकरी म्हणाले..
- सागरमालासारख्या प्रकल्पासाठी लाखो कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यात आली असून आता ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
- मुंबई-दिल्ली हे अंतर द्रुतगती महामार्गाने केवळ १२ तासांत कापता येईल. भांडवल उभारणीची आता विशेष अडचण नसून बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) आणि पीपीपी (सार्वजनिक व खासगी भागीदारी) माध्यमातून रस्ते, विमानतळ आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील शेकडो प्रकल्प राबविले जात आहेत.
- वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर वाढत असून इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा येत आहे. त्यांचे उत्पन्न वाढत आहे. संपूर्ण इथेनॉलवर चालणारी टोयोटाची नवी मोटार ऑगस्टमध्ये भारतात बाजारपेठेत दाखल होणार आहे.
- देशात विद्युत वाहनांची संख्या वाढत असून चार्जिग स्टेशनचा प्रश्न आता येत नाही. या वाहनांसाठी आता प्रतीक्षा यादी आहे.