मुंबई ठाण्यात पावसाची हजेरी, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती
मान्सूनच्या मुंबईतील आगमनाचे गणित बिपरजॉय चक्रीवादळामुळे बिघडले. पण आज (शुक्रवार 23 जून 2023) मुंबई ठाण्यात पावसाने हजेरी लावली. सकाळी पडलेल्या या पावसाचा आणि बदललेल्या वातावरणाचा आढावा घेऊन हवामान खात्याने मान्सूनच्या मुंबईतील आगमनाबाबत महत्त्वाची माहिती दिली.
हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार मुंबईत शनिवार 24 जून 2023 पासून मान्सून सक्रीय होईल. वातावरणातील बदलामुळे पाऊस पडण्यास सुरुवात होईल. उकाड्याने त्रासलेल्या आणि पावसाची वाट बघत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल. शेतीची कामं रखडल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यासाठी मान्सून आनंदवार्ता घेऊन येईल. शेतकऱ्यांना लवकरच पेरणीची कामं सुरू करता येतील.
आज (शुक्रवार 23 जून 2023) सकाळी मुंबई, ठाणे, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली तसेच चंद्रपूरमध्ये पावसाने हजेरी लावली. पाऊस पडला आणि वातावरण बदलले. हवेत सुखद गारवा निर्माण झाला. उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. नागरिक सुखावले.
अचानक आलेल्या पावसामुळे सकाळी नागरिकांची पंचाईत झाली.ज्यांनी छत्री रेनकोट सोबत आणले नव्हते त्यांना भिजावे लागू नये म्हणून धावपळ करून जवळचा सुरक्षित आडोसा गाठावा लागला. पण पावसाचे आगमन झाल्याचे बघून नागरिक सुखावले.
चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस
चंद्रपूरमध्ये दीर्घ प्रतीक्षेनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. चंद्रपूरपासून पुढे विदर्भाच्या दिशेने टप्प्याटप्प्याने मान्सून सक्रीय होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. कोल्हापूरमध्ये राधानगरी तालुक्यात तर रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्री काही ठिकाणी पाऊस पडला. साताऱ्यात सकाळी ढगाळ वातावरण होते. नाशिकमध्ये सोमवारपासून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे बिघडलेली परिस्थिती सावरू लागली आहे. महाराष्ट्रात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.