क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

सुपारी घेऊन पत्रकारावर गोळीबार; जमिनीच्या व्यवहारातून घडला प्रकार, १३ जण ताब्यात


पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून सुपारी घेऊन पत्रकारावर गोळीबार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला

या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्या ४ अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, १ जिवंत काडतूस, ३ कोयते, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाइल असा २ लाख २५ हजार रुपयांचा मालदेखील जप्त केला आहे.

प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे (वय २०, रा. राजेंद्रनगर, दत्तवाडी), अभिषेक शिवाजी रोकडे (वय २२, रा. नांदेड गाव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकूण १३ जणांना ताब्यात घेतले असून, त्यातील ७ जण अल्पवयीन आहेत. काही मुले उच्च शिक्षित असल्याचे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

फिर्यादी हे एका दैनिकात उपनगर वार्ताहर म्हणून काम करतात. ते २७ मे रोजी रात्री दुचाकीवरून घरी जात असताना दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी त्यांच्या अंगावर मिरची पावडर टाकून कोयता घेऊन अंगावर धावून गेले होते. त्यावेळी फिर्यादी जीव वाचवून तेथून पळून गेले होते. त्यानंतर ११ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ते घराजवळ आले असताना दोन दुचाकीवरून आलेल्या ५ जणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यातील एकाने पिस्तुलातून त्यांच्यावर गोळीबार केला. फिर्यादी हे खाली वाकल्यामुळे यातून वाचले.

या आरोपींनी तोंडाला रुमाल व मास्क घालून तोंड लपवत डोक्यावर टोपी घातली होती. रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्हीत गाडीचा नंबर स्पष्ट दिसून आला नाही. पोलिसांची दोन पथके तयार करून एक पथक रांजणगावला, तर दुसरे धायरी येथे रवाना केले. यात पोलिसांनी पेरणे फाटा येथे पाठलाग करून दोघांना पकडले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

फिर्यादी यांची धायरी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. त्याचा वाद सुरू आहे. दरम्यान, ही सुपारी कोणी दिली होती, किती रकमेची होती, याची माहिती पोलिसांनी दिली नाही. स्वारगेट ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर व प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सुनील झावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *