राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी भुजबळ आशावादी, स्वत:सोबत घेतली आणखी तिघांची नावं
मुंबई, 22 जून : विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करा, आपल्याला या पदामध्ये रस नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलं.
एवढच नाही तर आपल्याला संघटनेमध्ये काम करायची इच्छाही अजित पवारांनी बोलून दाखवली, त्यामुळे अजित पवारांची नजर प्रदेशाध्यक्षपदावर असल्याचंही बोललं जात आहे. अजित पवारांच्या या मागणीनंतर छगन भुजबळ यांनी सूचक विधान केलं आहे. तसंच त्यांनी आपलीही प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा असावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.
यासाठी छगन भुजबळ यांनी स्वत:सह आणखी तीन नेत्यांची नावं घेतली आहेत. अजितदादांनी इच्छा बोलून दाखवली अन् जयंत पाटलांनी व्यासपीठावरच दिलं उत्तर, म्हणाले… ओबीसीमध्ये सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड, धंनजय मुंडे, सुनील तटकरे, आणि शेवटी अनुभवी अध्यक्ष हवा असेल तर आपणही तयार असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत. ओबीसींना जबाबदारी दिली तर आपण ओबीसी समाज जोडू शकतो, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. काँग्रेस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्षही ओबीसी असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
तसंच जयंत पाटील 5 वर्ष एक महिना अध्यक्षपद सांभाळत आहेत, पण आपल्याला 4 महिनेच अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली होती, असंही भुजबळ म्हणाले आहेत. भाजपचा टोला दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदावरून भाजपने राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. ज्या घटना राष्ट्रवादीत घडतात त्या त्यांचा अंतर्गत प्रश्न आहेत. त्याच्यावर भाष्य करावं की नाही हा प्रश्न आहे. त्याचबरोबर वर्धापनदिनी शितयुद्ध सुरु झालंय, काही दिवसांनी राष्ट्रवादीत टोळी युद्ध दिसेल असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.