‘पेरणीची वेळ गेली नाही, घाई करू नका’; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला
बिपरजॉय वादळामुळे विदर्भात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले असून, आता पुन्हा वातावरण बदलत आहे. मोसमी पाऊस जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विदर्भात एन्ट्री करेल, असे हवामान विभाग सांगत असल्याने अद्याप पेरणीची वेळ गेलेली नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करू नये.
नागपूर : बिपरजॉय वादळामुळे विदर्भात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले असून, आता पुन्हा वातावरण बदलत आहे. मोसमी पाऊस जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विदर्भात एन्ट्री करेल, असे हवामान विभाग सांगत असल्याने अद्याप पेरणीची वेळ गेलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई करू नये. आपल्याकडे 25 जुलैपर्यंत पेरणी करता येते, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
मान्सूनच्या कालावधीमध्ये नागपूरसह विदर्भात 20 जूनपर्यंत सरासरी दीडशे मिली मीटरपर्यंत पाऊस येतो, असा आजवरचा अनुभव आहे. यादरम्यान खरीपाच्या सुमारे 20 टक्क्यांपर्यंत पेरण्याही आटोपतात. विदर्भात साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सूनपूर्व पाऊस होतो. मात्र, यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनवर परिणाम झाला असून, खरीप पेरणीचे नियोजन बिघडले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर विभागात 20.30 लाख हेक्टर पेरणीचे क्षेत्र आहे. आतापर्यंत 0.03 टक्केच पेरणी झाली आहे.
स्कायमेट आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार 24 जूनपासून विदर्भात पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. विदर्भात जूनच्या शेवटपर्यंत समाधानकारक पाऊस पडेल. मात्र, हा अंदाज देखील चुकल्यास दुष्काळाचे सावट ओढवणार आहे.
नागपूरचा विचार केल्यास जिल्ह्यात यंदा खरीपाचे 4.79 लाख हेक्टरवरचे नियोजन आहे. यामध्ये अद्याप पेरणीची वेळ गेलेली नाही. त्यामुळे कुठलीही घाई करण्याची गरज नाही. आपल्याकडे 25 जुलैपर्यंत पेरणी करता येते. किमान शंभर मिली मिटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे सांगितले आहे.