आगामी मान्सूनपूर्व तयारीसाठी चिपळूण येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व उपविभाग अधिकारी चिपळूण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली.यावेळी विविध अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सन 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे झालेली वित्त व जिवीतहानी लक्षात घेऊन 2023 मध्ये आगामी काळात होणारी संभाव्य पर्जन्यवृष्टी व त्याअनुषंगाने उदभवणारी संभाव्य आपत्ती यांचा विचार करून चिपळूण उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या एक वर्षाच्या कालावधीसाठी विविध विभागांनुसार नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
यामध्ये नियंत्रण कक्ष सूचना पथक, दक्षता पथक,पूर पातळी पथक,यंत्रसामग्री पथक,अन्नधान्य भोजन पथक,पाणी पुरवठा पथक,विद्युत पथक,साफसफाई आरोग्य पथक, औषधोपचार रक्त पुरवठा व रुग्णवाहिका पथक,निवारा पथक,वाहतूक पथक, दूरध्वनी व इंटरनेट सुविधा पथक,समन्वय व शिष्टाचार पथक अश्या पथकांच्या नियुक्ती करण्यात आल्या असून प्रत्येक पथकाची जबाबदारी प्रत्येक विशिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.ही नियुक्ती 1 वर्षाकरिता करण्यात आली असून आपली जबाबदारी योग्य रित्या पार न पडणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश देखील या नियुक्तीमध्ये देण्यात आले आहेत.