जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह सेवानिवृत्तीचे वय साठ करण्यासह अन्य काही मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची 22 जून रोजी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
त्यामुळे राज्यातल्या दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात बेमुदत संप पुकारला होता. त्यानंतर राज्य सरकारी वित्त विभागाचे माजी सचिव सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनेच्या बैठकाही झाल्या. आता येत्या 22 जून रोजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे म्हणाले की, राज्याच्या सेवेतील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचे प्रश्न हे सरकार व प्रशासनाशी चर्चा विनिमिय व सौहार्दाच्या वातावरणात सोडवण्याचे महासंघाचे धोरण आहे. पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत अनेक प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाचा पुढील कृती आराखडा निश्चित होईल, असे ग.दि. कुलथे म्हणाले.