ताज्या बातम्याधार्मिकमहत्वाचेसोलापूर

आषाढी वारीसाठी येणार १८ लाख वारकरी! पोलिसांचा ६ हजारांचा बंदोबस्त; वारकऱ्यांसाठी ५२५० बसगाड्यांची सोय


सोलापूर :- पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीसाठी १६ ते १८ लाख वारकरी येतील, असा अंदाज पोलिस प्रशासनाचा आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाच हजार बसगाड्यांची सोय केली आहे.

स्थानिक पातळीवर सोलापूर विभागाच्या २५० गाड्या असतील.

येत्या २९ जूनला आषाढी वारीचा सोहळा असून दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व इतर राज्यातून २० लाखांपर्यंत भाविक पंढरीत दाखल होतात. पोलिस प्रशासन, राज्य महिला आयोग, आरटीओ, अशा वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या अडचणींवर मात केली जात आहे. दरवर्षी पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांचा अंदाज घेऊन एसटी महामंडळाने पाच हजार बसगाड्यांची सोय केली आहे.

मराठवाड्यातून येणाऱ्या बसगाड्या भीमा नगर बस स्थानकावर, खानदेशातून येणाऱ्या बस श्री विठ्ठल कारखान्यावरून, पुणे-सातारासह पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या बसगाड्या चंद्रभागा नगर येथून ये-जा करतील. स्थानिक पातळीवरील २५० अतिरिक्त गाड्या अक्कलकोट, तुळजापूर, मंगळवेढा, शिखर शिंगणापूर यासह गरजेच्या ठिकाणाहून धावतील.

पाच हजार बसगाड्यांसाठी दहा हजार चालक-वाहक व इतर विभागांचे अधिकाऱ्यांचा वॉच एसटी वाहतुकीवर असणार आहे. त्या नियोजनासाठी आज (सोमवारी) पंढरपुरात अधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. त्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एसटी प्रवाशांसाठी १८००२२१२५० हा टोल फ्री हेल्पलाइन नंबर आहे. बसगाड्यांच्या वेळापत्रक त्यावरून समजणार आहे.

‘या’ वारकऱ्यांना सवलतीचा प्रवास

शिंदे-फडणवीस सरकारने काही महिन्यांपूर्वी एसटी बसगाड्यातून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आषाढी वारीसाठी येणाऱ्या महिला वारकऱ्यांना अर्ध्या तिकिटात पंढरीत दाखल होता येणार आहे. दुसरीकडे ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना केवळ आधारकार्ड किंवा मतदान कार्ड दाखवून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे यंदा महिला व ज्येष्ठ वारकऱ्यांची संख्या अधिक असेल, असा अंदाज एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सहा हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त

आषाढी वारीला येणाऱ्या भाविकांचा अंदाज घेऊन यंदा सहा हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त पंढरीत असणार आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली यासह इतर काही ठिकाणाहून देखील बंदोबस्त मागविला आहे. पोलिसांच्या मदतीला जवळपास एक हजार होमगार्ड असतील. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके देखील वारी काळात नेमली जाणार आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *