शाळकरी मुलींना मोफत प्रवास कधी? ११ लाख लोकसंख्येच्या सोलापुरात महापालिका परिवहनच्या फक्त २४ बसगाड्या
सोलापूर : शहरातील नागरिकांना स्वस्तात प्रवास मिळावा, खासगी वाहनांकडून त्यांची लूट होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने परिवहन सेवा सुरु करण्यात आली. एकेकाळी फायद्यात चालणाऱ्या परिवहनच्या ताफ्यात सव्वाशेहून अधिक बसगाड्या होत्या.
मात्र, सध्या ११ लाख लोकसंख्येच्या सोलापूरचा परिवहनच्या अवघ्या २४ गाड्यांवर डोलारा आहे. त्यालाही चालक-वाहक नाहीत, अशी अवस्था झाली आहे.
स्मार्ट सिटीत नागरिकांना उन्हाळा असो वा पावसाळा, नियमित पाण्यासाठी जवळपास २७ वर्षांपासून संघर्षच करावा लागतोय. रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत म्हणूनही मोर्चे काढावे लागतात. दरम्यान, सोलापूर शहरात प्रवेश करणारा मुख्य रस्ता जुना पुना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत, अनेक महिन्यांपासून उखडलेलाच आहे. अनेकदा महापालिका आयुक्तांसह वेगवेगळे अधिकारी त्या रस्त्यांवरून ये-जा करतात, पण रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक उंच असलेल्या चेंबरकडे त्यांचे लक्ष गेले नाही, हे विशेष.
महागड्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या अधिकाऱ्यांना रुग्णवाहिकेतून येणाऱ्या रुग्णांच्या वेदनांची जाणीव कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यातच खासगी वाहनांचा दर परवडत नसल्याने पायी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना स्वस्तातील परिवहन सेवा मिळेल का, हाही प्रश्न आहे. रस्त्यांवरील अतिक्रमण व भरमसाट वाढलेल्या रिक्षा अन् अस्ताव्यस्त थांबे, यामुळे मोठ्या बसगाड्या शहरातून फिरू शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाकडे सध्या २८ ते ३० मिनी बसगाड्या आहेत, पण त्यातील २४ ते २५ बस मार्गावर धावत आहेत. चालक-वाहक नसल्याने काही गाड्या बंद ठेवाव्या लागत असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मोडकळीस आलेल्या परिवहन सेवेला ‘अच्छे दिन’ येतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२४ बसगाड्या अन् अवघे १५ चालक
महापालिकेच्या परिवहन उपक्रमाअंतर्गत सध्या २४ बसगाड्या रस्त्यांवर धावत आहेत. पण, वेळेवर व पुरेशा गाड्या नसल्याने सर्वसामान्यांना नाइलाजास्तव रिक्षातून प्रवास करावा लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. सध्या परिवहनच्या २४ बसगाड्यांसाठी केवळ १५ चालक व १५ वाहक आहेत. त्यामुळे काही ठरावीक वेळेनंतर बसगाड्या मार्गावर दिसत नाहीत. नियोजनाअभावी दररोजचा खर्च एक लाखांपर्यंत अन् उत्पन्न ६० हजारांपर्यंत अशी अवस्था आहे. दुसरीकडे शहरात १६ हजारांवर रिक्षा असतानाही त्यांना महापालिकेने नवीन थांबे निर्माण करून दिलेले नाहीत. त्यामुळे ‘प्रवासी दिसेल तेथे थांबा’ अशी स्थिती निर्माण झाल्याने परिवहनसमोरील अडचणी वाढत आहेत.
‘त्या’ मुलींच्या मोफत प्रवासाचे काय?
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे शहरातील पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवासाची सोय करून देणयात आली आहे. त्यानुसार, सोलापूर शहरात महापालिकेच्या ५३ शाळा असून त्याअंतर्गत साडेपाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात अडीच हजारांपर्यंत मुली आहेत. तसेच शहरातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या देखील १० हजारांहून अधिक आहे. मात्र, शहरातील बहुतेक मार्गांवर बसच उपलब्ध नाहीत आणि विशेषतः शाळेच्या वेळेत बस नसल्याने ही योजना कागदावरच असून त्या मुलींच्या पालकांना पदरमोड करावी लागत आहे.
महापालिका परिवहनची सद्य:स्थिती
- एकूण बस
- २७
- मार्गावरील बस
- २४
- चालक
- १५
- वाहक
- १५