ताज्या बातम्याधार्मिकपुणेमहत्वाचे

माउलींच्या पादुकांना निरेत शाही स्नान ; वारीचा अर्धा टप्पा पूर्ण


निरा : टाळ-मृदंगाचा गजर, भगवी पताका घेतलेला वैष्णवांचा मेळा आणि मुखी विठ्ठलनामाचा जयघोष करीत, “अवघा रंग एक जाहला”ची अनुभूती देत चैतन्यमय वातावरणात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांना निरा नदीकिनारी श्री दत्त घाटावर रविवारी (दि.18) दुपारी 1.45 मिनिटांनी शाही स्नान घालण्यात आले.

त्यानंतर माउलींच्या पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. वारीची परंपरा सुरू करणा-या हैबतबाबांच्या जन्मभूमीत जमलेल्या भाविकांनी माउलींच्या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले.

वाल्हे येथील मुक्काम आटोपून रविवारी सकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळ्याने पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. सकाळी नऊ वाजता पिंपरे खुर्द विहीर येथे न्याहरी घेऊन दुपारचा नैवेद्य व विसाव्यासाठी निरा गावात साडेदहाच्या सुमारास प्रवेश केला. शिवाजी चौकात निरेचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी दुपारच्या विसाव्याकरिता निरा नदीकाठावरील पालखीतळावर विसावली. यंदा उन्हाचा तडाखा जास्त असल्याने दर्शन रांगेत उभे असलेल्या भाविकांसाठी सावली करण्यात आली होती. तर आरोग्य विभागाने हिरकणी कक्ष उभारला होता. परिसरातील हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये इंद्रायणी, निरा, चंद्रभागा तीरावरील स्नानाला अधिक महत्त्व आहे. सोहळ्याच्या वाटचालीत निरा येथे नदीच्या तीर्थात श्री दत्त घाटावर माउलींच्या पादुकांना पहिले शाही स्नान घालण्याची परंपरा आहे. त्यानंतर सोहळ्याचा प्रवासाचा अर्धा टप्पा पूर्ण होत असतो.

दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर दुपारी दीड वाजता हा सोहळा निरा स्नानासाठी मार्गस्थ झाला. निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून माउलींचा रथ श्री दत्त मंदिरासमोर आल्यानंतर माउलींच्या पादुका रथामधून बाहेर घेऊन सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. या वेळी पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड.विकास ढगे पाटील, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळामालक राजेंद्र आरफळकर व मानक-यांच्या उपस्थितीत टाळ-मृदंगाच्या गजरात माउलींच्या पादुकांना दत्तघाटावर भक्तिमय वातावरणात शाही स्नान घालण्यात आले. यानंतर पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख , पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुरंदर-भोरचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, प्रांताधिकारी मीनाज मुल्ला, तहसीलदार विक्रम राजपुत, आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.रामचंद्र हंकारे आदींनी पालखी सोहळ्यास निरोप दिला.
पादुका स्नानानंतर पालखी सोहळ्याचे स्वागत साताराचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, साताराचे पोलिसप्रमुख समीर शेख, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर आदींनी स्वागत केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *