धक्कादायक! एमपीएसीत सहावी आलेल्या युवतीचा संशयास्पद मृत्यू; राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह
वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना रविवारी( दि.१८) समोर आली आहे. एमपीएससीच्या परीक्षेत सहावी आलेल्या तरुणीचा हा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ही तरुणी मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील आहे. मयत तरुणीचे नाव दर्शना दत्ता पवार (वय २६) असे आहे. दर्शना पुण्यातून १२ जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दाखल होती. या घटनेबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात तरुणीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना ९ जून रोजी पुण्यातील एका खासगी अकॅडमीमध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी कुटुंबीय दर्शनाला फोन करत होते. परंतू, तिने घरातील कोणाचेही फोन उचलले नव्हता. त्यामुळे तिच्या वडिलांनी १२ जून रोजी पुण्यात येऊन ॲकॅडमीत चौकशी केली.
त्यावेळी दर्शना ही राजगड किल्ला फिरण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वडील आणि पोलिसांकडून मुलीचा शोध सुरु होता. दर्शना ही एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आली होती. तिची ‘रेंज फॉरेस्ट ऑफिसर’ या पदावर नुकतीच निवड झाली होती.
वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना ९ जून रोजी पुण्यातील एका खासगी अकॅडमीमध्ये सत्कार स्वीकारण्यासाठी आली होती. दुसऱ्या दिवशी कुटुंबीय दर्शनाला फोन करीत होते. परंतु तिने घरातील कोणाचेही फोन उचलले नाहीत. त्यामुळे तिच्या वडिलांनी १२ जून रोजी पुण्यात येऊन ॲकॅडमीत चौकशी केली. त्यावेळी दर्शना ही राजगड किल्ला फिरण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वडील आणि पोलिसांकडून मुलीचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान, गुंजवणी ग्रामपंचायतचे सदस्य शिवाजी भोसले हे रविवारी सकाळी राजगडच्या पायथ्याशी सतीचा माळ परिसरात गेले होते. त्यांना तेथे दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी परिसरात पाहणी केली असता मृतदेह अर्धवट सडलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिस पाटील बाळासाहेब रसाळ यांना दिली. त्यानंतर रसाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्याशी संपर्क साधला.
पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मितेश गट्टे म्हणाले, दर्शनाच्या शरीरावरील जखमा मारहाणीमुळे झाल्या आहेत की प्राण्याच्या हल्ल्यामुळे याचा तपास करण्यात येत आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होइल. हा अकस्मात मृत्यू आहे की घातपात? याबाबत पुणे ग्रामीण पोलीस तपास करत आहेत. वेल्हे पोलीस आणि दर्शनाचे वडील दत्तात्रेय पवार घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मृतदेहाजवळ मोबाईल, पर्स, शूज, ओढणी आढळून आली. उपसरपंच बाळासाहेब पवार, स्थानिक रहिवासी राहुल बांदल, पोलिस मित्र संतोष पाटोळे, विजय गोहिणे, विक्रांत गायकवाड यांनी मृतदेह गडाच्या पायथ्यास आणण्यास मदत केली. दर्शनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविला आहे.