गेल्या हंगामात सोयाबीनला ७ ते ८ हजार रुपये भाव पाहिल्यानंतर यंदाही दरात अशीच वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मागील हंगामात मार्च महिन्यानंतर सोयाबीन भावात सुधारणा झाली होती.
मार्चपर्यंत भावपातळी ५ हजार रुपयांच्या दरम्यान होती. मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास ८० टक्के सोयाबीन विकले होते.
सहाजिकच तेजीचा फायदा अगदी बोटांवर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनाच मिळाला. मागील हंगामात कमी भावात सोयाबीन विकल्यानंतर दरात तेजी आल्याचे पाहून, यंदा शेतकऱ्यांनी मार्चनंतर सोयाबीन विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये सोयाबीन आवक अपेक्षेपेक्षा कमीच राहिली.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये एक तृतीयांश म्हणजेच ५० लाख टनांची आवक झाली. मागील हंगामात याच काळातील आवक ४० लाख टन होती. सहाजिकच यंदाची आवक जास्त दिसत होती. पण गेल्या हंगामात उत्पादन आणि आधीचा शिल्लक साठा मिळून १२६ लाख टनांचा पुरवठा होता.
पण चालू हंगामात गेल्या वर्षीपेक्षा तब्बल २८ लाख टनांनी जास्त पुरवठा राहिला. उत्पादन १२४ लाख टन आणि मागील हंगामातील शिल्लक २५ लाख टन, असे एकूण १५४ लाख टनांचा पुरवठा झाला. मागील हंगामातील शिल्लक सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीलाच बाजारात येईल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळातील सोयाबीन आवक कमीच होती.
पण यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीन उत्पादनात वाढ झाली. अर्जेंटिनात उत्पादन घटले, पण ब्राझीलने मोठी झेप घेतली. ब्राझीलमध्ये यंदा १ हजार ५०० लाख टन उत्पादन झाले. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आलेली तेजी ब्राझीलचे सोयाबीन बाजारात आल्यानंतर गायब झाली.
ब्राझील सोयाबीनचे गाळप खूपच कमी करतो. ब्राझील थेट सोयाबीन निर्यातीला जास्त प्राधान्य देत असतो. ब्राझीलच्या सोयाबीनचा मुख्य ग्राहक आहे चीन. यंदा चीनने ९०० लाख टनांपेक्षा अधिक आयातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी जास्तीत जास्त सोयाबीन ब्राझीलमधून आयात केले जाणार आहे.
ब्राझीलचे सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात आल्यानंतर सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव पडले. १५ डॉलरच्यावर असलेले सोयाबीन १४ डॉलरपेक्षा कमीच राहिले. मागील दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव १३ ते १४ डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यानच फिरत आहेत.
तर ५०० डॉलरचा टप्पा गाठलेल्या सोयापेंडने मागील दोन महिन्यांत क्वचितच ४०० डॉलरचा टप्पा गाठला. सोयापेंडीचे भाव ३०० ते ४०० डॉलरच्या दरम्यान आहेत. सहाजिक आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाईचा देशातील बाजारावर दबाव आला.
दुसरीकडे उत्पादन वाढून मागणी थंड असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेल, सोयातेल आणि सूर्यफूल तेलाचे दर पडले. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने तेलाचे साठे पडून होते. पण निर्यातीबाबत तोडगा निघाल्यानंतर दोन्ही देशांनी कमी भावात सूर्यफूल तेलाचा साठा बाजारात आणला.
नव्या हंगामातील उत्पादनासाठी साठे खाली करण्याचेही उद्दिष्ट होते. दुसरीकडे मागील दोन वर्षे देशात खाद्यतेलाचे भाव वाढले होते. त्यामुळे भारत सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात मोठी कपात केली. दोन वर्षांत ४० लाख टन कच्चे सोयाबीन आणि कच्चे सूर्यफूल तेलाची शुल्कमुक्त आयात करण्यासही परवानगी दिली होती.
त्या निर्णयात आता बदल करण्यात आला. पण देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा आला. सर्वच खाद्यतेलाचे भाव जवळपास ४० टक्क्यांपर्यंत कमी झाले. सूर्यफूल तेलाची आयात वाढल्याने पहिल्यांदाच सोयाबीन तेल सूर्यफूल तेलापेक्षा महाग झाले. सहाजिकच सूर्यफूल तेलाला मागणी वाढली. याचा परिणाम सोयाबीन बाजारावर होत होता.
देशात वाढले खाद्यतेलाचे साठे
देशात खाद्यतेला आयात वाढून साठे वाढले. देशातील तेल विपणन वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे असते. चालू तेल वर्षात यंदा खाद्यतेल आयात २० टक्क्यांनी वाढली. यंदा पहिल्या सात महिन्यांमध्ये ९० लाख ५५ हजार टन आयात झाली.
गेल्या हंगामात याच काळात ७५ लाख ४८ हजार टनांची आयात झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाल्यानंतर आयात वाढत गेली. त्यामुळे देशातील खाद्यतेलाचा स्टॉकही गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. १ जून रोजी देशात २९ लाख ४१ हजार टनांचा स्टॉक होता.
तर १ जून २०२२ रोजी हाच स्टॉक २२ लाख ४६ हजार टनांवर होता. मागील काही महिन्यांची आयातीची गती काहीशी मंदावली, त्यामुळे स्टॉक कमी झाला. नाहीतर एप्रिलमधील स्टॉक जवळपास ३५ लाख टनांच्या दरम्यान होता.
मे महिन्यात वाढली सोयाबीन, सूर्यफूल तेल आयात
मे महिन्याचा विचार करता पाम तेलाची आयात कमी झाली तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात वाढली आहे. पाम तेलाची आयात एप्रिलच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी होऊन मे महिन्यात ४ लाख ३९ हजार टनांवर आली. तर सोयाबीन तेलाची आयात २१ टक्क्यांनी वाढली. मे महिन्यात भारतात ३ लाख १९ हजार टनांची आयात झाली. तसेच सूर्यफूल तेलाचीही आयात १८ टक्क्यांनी वाढून २ लाख ९५ हजार टनांवर पोहोचली आहे.