कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहूंनी निर्माण केलेल्या समतेच्या विचारांच्या कोल्हापुरात जाती-धर्मांमध्ये फूट पाडून सामाजिक एकोप्याला सुरुंग लावण्याचे षड्यंत्र सातत्याने सुरू आहे.
याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या स्टेटसवरून दंगल घडविण्यात आली. अशा दंगलखोरांना त्यांची जागा दाखविण्यासाठी राजर्षी शाहू जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवार, दि. 25 जून रोजी दुपारी 4 वाजता शाहू महाराज यांच्या उपस्थितीत होणार्या शिव-शाहू सद्भावना यात्रा व सभेच्या आयोजनाचा निर्धार करण्यात आला. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शनिवारी शाहू सालोखा बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आर. के. पोवार होते. बैठकीस विविध जाती-धर्मीय संघटना, राजकीय पक्ष, तालीम-मंडळे, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. तसेच सद्भावना दौड व सभेची रूपरेषा सांगितली.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, दंगल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दंगलीची चौकशी करायचे सोडून कोल्हापूरात औरंग्याची अवलाद शोधण्याची भाषा करतात. पुरोगामी कोल्हापूरच्या बदनामीचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. दिलीप देसाई यांनी कोल्हापुरात दंगल होणे दुर्दैव आहे. ती पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, दंगल घडविणारे नामानिराळे राहिले असून त्यांची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी. कॉ. अतुल दिघे यांनी, महागाई-बेरोजगारी यासह सामाजिक प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी अशा दंगली घडविल्या जात असल्याचे सांगितले. ‘आप’चे संदीप देसाई यांनी दंगली घडविण्यासाठी बाहेरून भाडोत्री लोक आणले होते.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. कॉ. गिरीश फोंडे म्हणाले, दंगलींमध्ये बहुजन समाजाचा तरुण भरडला जातो. त्यापासून त्यांना प्रवृत्त करण्यासाठी प्रबोधन गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे राजेश लाटकर म्हणाले, पुरोगामी कोल्हापूरच्या बदनामीसाठी जातीय वाद्यांकडून सातत्याने प्रयोग सुरू आहेत. दंगलीसाठी कारणीभूत असणारे व्हिडीओ, पोस्ट कोठे तयार होतात? याची चौकशी पोलिसांकडून व्हावी. अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, दंगलीत सहभागी होणार्या युवकांनी आपल्या करिअरचा विचार करावा. तसेच युवकांनी दंगलीच्या विचार सारणीला बळी पडू नये यासाठी त्यांचे प्रबोधन व्हावे. कॉ. दिलीप पवार यांनी, एखाद्याच्या चुकीबद्दल संपूर्ण समाजाला जबाबदार धरू नये. जबाबदारी निश्चित करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे सचिन चव्हाण यांनी दंगलखोरांना शिव-शाहूंच्या विचारांच्या दांडक्याने उत्तर देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सीमा पाटील यांनी, धर्मासाठी हिंसा महत्त्वाची अशी शिकवण जातीय वाद्यांकडून तरुणांना दिली जात आहे. ते रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वत:च्या घरापासून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी, शाहू-फुले-आंबेडकर विचारांना बाजूला ठेवण्यासाठी सत्ताधार्यांकडून विविध कायदे केले जात असल्याचा आरोप केला. आर.के. पोवार यांनी दंगल घडेपर्यंत पोलिस खाते काय करत होते ? असा सवाल केला.
बैठकीस माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, अदिल फरास, भुपाल शेटे, मेघा पानसरे, शाहिर दिलीप सावंत, पै. बाबा महाडिक, अनिल चौगुले, उमेश पोवार, अजित सासने, भारती पोवार, प्रभाकर पाटील, बाबन रानगे, कॉ. उदय नारकर, सोमनाथ घोडेराव उपस्थित होते. आभार बाजीराव नाईक यांनी मानले.
जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही
‘आभाळाची आम्ही लेकरं, काळी माती आमची आई, जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही…’ असे गीत सादर करून राजेश लाटकर यांनी उपस्थितांत एकजुटीसाठीची प्रेरणा निर्माण केली.
दोषींवर कारवाई झालीच पाहिजे
कोल्हापुरात झालेल्या दंगलीची सखोल चौकशी करून ती करणार्या आणि ती घडविणार्यांवर कठोर कारवाई बैठकीत अनेकांनी व्यक्त केली. दंगलखोर कोणीही असो हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
यात्रा – सभेसाठी आचारसंहिता
यात्रेत शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा भगवा ध्वज आणि राष्ट्रीय तिरंगा ध्वज वापरावा. कोल्हापूरच्या एकतेची आणि सामाजिक सलोख्याची परंपरा द़ृढ करणे हा उद्देश असेल. सर्व धर्मीय व विविध ज्ञाती बांधवांच्या एकजुटीने कोल्हापूरचा आदर्श असणारा बंधुभाव व एकजूट पुन्हा देशाला दाखवून देण्याचा निर्धार करण्यात आला.