पुणे : अवकाळी, गारपिटीमुळे झालेले मोठे नुकसान. बाजारात अत्यंत कमी दर मिळत असल्यामुळे काढणी, वाहतूक खर्चही परवड नसल्यामुळे शेतकरी तयार कांदा शेतातच गाडून टाकत आहे.
बाजारात आलेल्या कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यामुळे ऐन दिवाळी किंवा दिवाळीनंतर कांदा शंभरी गाठू शकतो, असा अंदाज बाजारातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
यंदा अवकाळीमुळे कांदा भिजला. गारपिटीमुळे सडला, दर्जा घसलेल्या कांद्याला बाजारात दर मिळाला नाही. बाजारात अत्यंत कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचा काढणी आणि वाहतूक खर्चही निघत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी कांदा काढण्यापेक्षा शेतातच गाडून टाकला. शेळ्या-मेंढ्या कांद्यात सोडल्या. अनेक शेतकऱ्यांनी कांदा उकिंरड्यावर, रस्त्यांवर फेकून दिला.
या सर्वांतून बाजारात आलेल्या कांद्याचा दर्जाही खालावलेला आहे. त्यामुळे एकूणच दिवाळीत किंवा दिवाळीनंतर कांदा ग्राहकांना रडविणार आहे. बाजारातील जाणकरांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यापासून बाजारातील कांद्याची उपलब्धता कमी होईल. सप्टेबर महिन्यापासून कांद्याची टंचाई जाणवू लागेल. ही कांदा टंचाई ऑक्टोबर, डिसेंबरमध्ये तीव्र होऊन कांदा शंभरी गाठेल, असा अंदाज आहे.
दर्जेदार कांदा फक्त पस्तीस टक्केच
खरिपातील कांद्याची टिकवण क्षमता फार असत नाही. त्यामुळे शेतकरी खरिपातील कांदा तत्काळ विक्री करतात. उन्हाळी हंगामातील कांदा जास्त टिकतो. निर्यातीसाठीही उन्हाळी हंगामातील कांद्यालाच प्राधान्य दिले जाते. पण, यंदा उन्हाळी कांद्याची काढणी सुरू असताना एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे काद्यांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी जेमतेम पस्तीस टक्केच कांदा दर्जेदार आहे, अशी माहिती कांदा अभ्यासकांनी दिली.
क्षेत्र दुप्पट होऊन रडकथा कायम
राज्यातील कांद्याचे क्षेत्र पाच वर्षांत दुप्पट झाले आहे. राज्यात २०१७-१८ मध्ये राज्यात ५.१३ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड होत होती. २०२३मध्ये कांद्याच्या लागवडी खालील क्षेत्र दहा लाख हेक्टरवर गेले आहे. यंदा साधारण खरिपात ९० हजार हेक्टर, उशिराच्या खरिपात १.६५ लाख हेक्टर, रब्बी (उन्हाळी) हंगामात ५.९६ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. उन्हाळी हंगामात १०६ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज होता. नैसर्गिक आपत्तींमुळे उत्पादनात चाळीस टक्क्यांहून जास्त घट झाली आहे.
पन्नास टक्क्यांहून जास्त नुकसान
राज्यात तीन हंगामात कांदा उत्पादन होते. नैसर्गिक आपत्तींमुळे तीनही हंगामात काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. त्या परिणाम म्हणून कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन वर्षाच्या अखेरीस कांदा टंचाई जाणवू शकते, असे मत गोदाम इनोव्हेशनच्या संचालक कल्याणी शिंदे यांनी सांगितले. सिन्नर तालुक्यातील नीमगाव सिन्नर येथील कांदा उत्पादन शेतकरी अमोल मुळे म्हणाले, खरीप आणि रब्बी हंगामात मी कांदा केला होता. दोन्ही हंगामात सरासरी पन्नास टक्केच उत्पादन निघाले. काढणीच्या वेळी कांदा भिजल्यामुळे चाळीत साठवण्यापूर्वीच सुमारे वीस टक्के कांदा खराब झाला. चाळीत साठवलेला कांदाही आता खराब होऊ लागला आहे.