यंदा मात्र जूनच्या मध्यावरही पावसाचा पत्ताच नाही. आकाशात ढग येत आहेत. मात्र, पाऊसच पडत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
कऱ्हाड : हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज दिल्याने शेतकरी खरीप हंगामात चांगले पीक येईल, या आशेने आनंदात होता.
मात्र, जून महिना निम्मा होऊनही अद्याप पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दर वर्षी मॉन्सूनच्या पावसापूर्वी होणाऱ्या वळिवाच्या पावसावर आतापर्यंत सुमारे २५ ते ३० टक्के पेरण्या पूर्ण होतात. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सातारा जिल्हा हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात दर वर्षी सोयाबीन, बाजरी, भात, भुईमूग, मका, ज्वारी, मूग, नाचणी, तूर, उडीद, इतर कडधान्य आणि उसासह अन्य पालेभाज्या, भाजीपाल्याची पिके खरिपात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्याद्वारे शेतकऱ्यांना चार पैसेही मिळतात. त्यामुळे शेतकरी ही पिके दर वर्षी घेतात.हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे यंदा खरिपातील पिके चांगली येतील, हा अंदाज लावून शेतकरीही आनंदात होता. दर वर्षी पावसाळ्यापूर्वी वळिवाचे दमदार आगमन होते. त्यावर शेतकरी पेरणीपूर्व मशागती उरकून घेत अधूनमधून पडणाऱ्या वळिवाच्या पावसावर जमिनीतील ओल बघून पेरण्याही करून घेतात. त्यातून दर वर्षी १५ जूनपर्यंत सुमारे २५ ते ३० टक्के पेरण्या उरकलेल्या जातात.
यंदा मात्र जूनच्या मध्यावरही पावसाचा पत्ताच नाही. आकाशात ढग येत आहेत. मात्र, पाऊसच पडत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. अजूनही काही दिवस पाऊस न आल्यास पेरण्या लांबून रब्बीतील पिकांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पेरणीसाठी शेतजमिनी शेतकऱ्यांनी तयार केल्या आहेत. मात्र, पाऊसच नसल्याने शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
डोंगराळ भागात धूळवाफेवर पेरण्या
सातारा जिल्ह्यातील डोंगराळ भागातील शेतकरी त्यांच्या अंदाजानुसार धूळवाफेवर पेरण्या करतात. त्यात महाबळेश्वर, जावळी, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील डोंगराळ भागातील काही गावांचा समावेश आहे. यंदाही काही प्रमाणात तेथील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरण्या केल्या आहेत. मात्र, पावसाचा पत्ताच नसल्याने त्यांचेही धाबे दणाणले आहेत.