ताज्या बातम्या

नागरी बँकेच्या सायबर दरोड्याप्रकरणी ‘जामतारा’ व ‘नायजेरीयन’ संबंध उघड!


वर्धा : नागरी बँकेच्या सायबर दरोड्याप्रकरणी आरोपींची पाळेमुळे खणून काढण्यात यश आले असून यात ‘जामतारा’ व ‘नायजेरीयन’ संबंध असल्याचे धक्कादायी चित्र आहे.

येथील नागरी बँकेच्या मुख्य शाखेत २४ मेच्या पहाटे १ कोटी २१ लक्ष १६ हजार रुपयाची रक्कम ऑनलाईन माध्यमातून हडप करण्यात आली होती. या बँकेच्या येस बँकेत असलेल्या खात्यातून अत्यंत शिताफीने ही रक्कम लंपास झाली. ही रक्कम मणीपूर, मिझोराम, कर्नाटक व अन्य अशा एकूण नऊ राज्यांतील विविध बँकांच्या खात्यात वळती करण्यात आली होती. या अनुषंगाने पोलिसांनी सर्व तांत्रिक बाजू तसेच बँक अधिकाऱ्यांची माहिती घेतली. मात्र तपास शून्यावर आल्याने पाेलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी तांत्रिक तपास, बंगरूळू, मुंबई, दिल्ली व हैद्राबाद आशा पाच तपास चमू गठित केल्या.

तपासात ६० पेक्षा अधिक खाते गोठवण्यात आले. त्यामुळे गुन्ह्यातील २३ लाख रुपयाची रक्कम थांबविण्यात यश आले. वळती करण्यात आलेली रक्कम बंगरूळूच्या क्रिष्णा एंटरप्राईजेस या खात्यातून मुंबई एटीएमच्या माध्यमातून काढण्यात आली. हे खाते करीम नगर येथील रामप्रसाद नारायणा ॲले या आरोपींच्या नावे होते. ६ जूनला आंध्रप्रदेशातील शंकर केसाना व चंदू पारचुरू यांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही घटनेच्या एक दिवसापूर्वी विमानाने मुंबईत दाखल झाले होते.

दिल्लीतून रक्कम काढणाऱ्या सतिशकुमार जयस्वाल याचा शोध लागला. त्याच्याकडे वीसपेक्षा अधिक सिमकार्ड आढळून आले. त्याचे विविध बँकेत खाते आहे. त्याआधारे गया जिल्ह्यातील विनोद जमूना पासवान यास ताब्यात घेण्यात आले. पासवान याच्या संपर्कातील अनेक व्यक्ती सायबर घोटाळ्यात चर्चेत आलेल्या जामतारा या गावातील असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्ह्यातील रक्कम बंगळूरूच्या वेगवेगळ्या खात्यात वळती झाली होती. हे खाते ईरॉम जेमसन सिंग याच्या नावे होते. या व्यक्तीचे अस्तित्व राममूर्ती नगरात असल्याचे दिसून आले. मात्र या ठिकाणी हजारो आफ्रिकन लोक रहात असल्याने शाेध कार्यात अडचणी आल्या. मात्र रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून सदर व्यक्ती बंगळूरूच्या चिकापलप्पा या उच्चभ्रू वसाहतीत निवासी असल्याचे दिसून आले. ही व्यक्ती मुळची नायजेरीयन असून २०१९ पासून भारतात निवासी आहे. त्याला अटक करण्यात आली असून २० जूनपर्यंत पाेलीस काटवडी सुनावण्यात आली आहे.

गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेला हा नायजेरीयन अन्य व्यक्तीच्या नावाचे एटीएम जमा करण्याचे काम करतो. गुन्ह्यातील बँकखाते यानेच हाताळले. त्याच्या संपर्कातील इतर व्यक्तींची तसेच त्याने रक्कमेची लावलेली विल्हेवाट याचा तपास सुरू आहे. पुढील तपासासाठी हैद्राबाद व बंगळूरू येथे तपास पथक पाठविण्यात येणार असल्याचे पाेलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार व गुन्हे शाखेचे संजय गायकवाड यांनी तपासाच्या विविध टप्प्यांवर सहकार्य केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *