मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची कामगिरी कशी होती? सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यासमोर अनेक आव्हानं होती. त्यानंतर कर्जमाफी, पायाभूत सुविधांची कोंडी, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन असे अनेक मोठे प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर होते. दोन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 30 जून 2022 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
आता दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कार्यकाळामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता किती खूश होती? हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं आहे. हा ओपिनियन पोल झी न्यूज आणि मेटारिझनं केला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं काम कसं होतं? असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. या सर्वेक्षणातून जनतेनं कौल कोणाला आहे? हे समोर आलं आहे.
कसं होतं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचं काम?
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना जनतेला त्यांचं काम किती आवडलं आणि किती लोकांना आवडलं नाही, हे या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं काम अधिक चांगलं होतं, असं महाराष्ट्रातील 21 टक्के लोकांचं मत आहे. तसेच, 27 टक्के लोकांनी ठाकरे यांचं काम समाधानकारक असल्याचं म्हटलं आहे. 45 टक्के लोकांना उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी आवडली नाही आणि त्यांनी त्यांना वाईट म्हटलं आहे. उर्वरित सात टक्के लोकांनी ‘माहित नाही’ असं उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटानं जोरदार तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कुणाला? सर्वेक्षण काय म्हणतं?
महाराष्ट्रानं आतापर्यंत अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी पाहिल्या. अशातच महाराष्ट्राच्या जनतेचा कौल काय? त्या कोणाची बाजू घेणार? त्यांचं या सत्तासंघर्षाबाबतचं मत काय? याबाबत अनेक दावे-प्रतिदावे सत्ताधारी आणि विरोधकांकडून केले जात आहेत. अशातच आता एक नवं सर्वेक्षण समोर आलं आहे.
आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या युतीला बहुमत मिळताना दिसत आहे. या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला 165 ते 185 जागा मिळू शकतात. दुसरीकडे, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर त्यांना 88 ते 118 जागांवर विजय मिळू शकतो. राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) दोन ते पाच जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना 12 ते 22 जागा मिळताना दिसत आहेत.