पालखी सोहळ्यात हरित वारी अभियानाअंतर्गत वृक्षलागवड, 10 हजार वृक्षांची लागवड आणि संवर्धन होणार
मागील शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे. आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह इतर संताच्या पालख्या पंढरीचे दिशेनं रवाना झाल्या आहेत. या वारीच्या सोहळ्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुणे जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘हरित वारी’ अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 10 हजार वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्यात येणार आहे.
वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षांची लागवड
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हरित वारी’ उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत पालखी तळ आणि पालखी मार्गावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. वारकऱ्यांना वृक्षाचे महत्व समजावून देण्यासोबतच त्यांच्या हस्ते वृक्ष लागवडही करण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्षाचे संवधर्नही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
विविध प्रकारच्या उपयुक्त वृक्षांची लागवड
चिंच, वड, चाफा, पाम, नारळ, गुलमोहोर, कडुलिंब, पिंपळ, रेन ट्री, करंज, मोहोगनी, जांभूळ अशा विविध प्रकारच्या उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यासाठी चांगली रोपे देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. आतापर्यंत नगरपालिकेतर्फे 3 हजार 225, ग्रामपंचायत 2 हजार 350 आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे 2 हजार असे एकूण 7 हजार 575 वृक्ष लावण्यात येत आहेत. वृक्षांच्या संवर्धनाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
सात नगरपालिका आणि 25 ग्रामपंचायत क्षेत्रातही वृक्ष लागवड करणार
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणातर्फे ‘हरित वारी’ अंतर्गत लोणंद ते दिवेघाट संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पिसुर्टी, निरा, पिपरे, बाळुपाटलाची वाडी, पाडेगाव, लोणंद परिसरातील चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा 2 हजार झाडे लावण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील सात नगरपालिका आणि 25 ग्रामपंचायत क्षेत्रातही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील संपूर्ण वारी मार्गावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी देखील उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार यांनी केले आहे.