पावसाच्या अंदाजावर पाणी; राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला; २३ जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज
पुणे : मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. नैऋत्य मोसमी वारे १५ जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज फोल ठरला असून, आता २३ जूनपासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने गुरुवारी वर्तवली. नैऋत्य मोसमी वारे ११ जूनला तळकोकणात दाखल झाले. मात्र, त्यांची वाटचाल थांबली आहे. हवामान विभागाने येत्या चार आठवडय़ांचा पावसाचा विस्तारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार २३ जूनपासून महाराष्ट्रासह मध्य भारतात मोसमी पाऊस सुरू होण्यास पोषक वातावरण तयार होईल, अशी माहिती हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. राजस्थानवगळता देशाच्या अन्य भागांत मोसमी पाऊस २३ जूननंतर सक्रिय होईल, असेही ते म्हणाले.
मोसमी वारे १६ ते २२ जून या काळात ईशान्य भारत, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागांत दाखल होतील. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मोसमी वारे गुजरात आणि राजस्थानच्या बहुतांश भागात पोहोचतील. २३ ते २९ जून या काळात मोसमी वारे राजस्थानवगळता पूर्ण देशात दाखल होऊन देशाच्या बहुतांश भागांत पाऊस सुरू होईल. ३० जून ते ६ जुलै या आठवडय़ात देशात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. ७ ते १३ जुलै या काळातही देशात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
विदर्भात तापमानवाढ
विदर्भातील कमाल तापमान गुरूवारी चाळिशीपार गेले. तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशाहून अधिक वाढ झाल्याने अमरावती येथे तीव्र उष्णतेची लाट आली होती, तर यवतमाळ, वाशीम, अकोला, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली येथे उष्णतेची लाट आली होती. पुढील पाच दिवस विदर्भातील कमाल तापमानात कोणतेही बदल होणार नाहीत, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
जुलैच्या पहिल्या आठवडय़ात जोर
‘२३ जूनपासून कोकण, दक्षिण महाराष्ट्रात पावसास सुरूवात.
‘दमदार पावसासाठी जुलै उजाडण्याची शक्यता.
‘३० जून ते ६ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज.
‘७ ते १३ जुलै या काळात कोकणवगळता पावसात काहीसा खंड पडण्याची शक्यता.
विलंबाचा इतिहास..
आतापर्यंत मुंबईत अनेकदा पावसाचे आगमन लांबले. या वर्षांचाही त्यात समावेश होऊ शकतो. नैऋत्य मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्रात २०२२ मध्ये १३ ते १६ जूनदरम्यान दाखल झाले होते, तर २०२१ मध्ये ११ ते १७ जूनदरम्यान दाखल झाले होते. २०२०मध्ये १४ जून रोजी मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला होता. २००९ मध्ये सर्वात उशिरा म्हणजे २१ जून रोजी मोसमी पाऊस मुंबईत दाखल झाला होता.