ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

स्वारगेट परिसरात पत्रकारावर गोळीबार


पुणे – शहरातील एका दैनिकाच्या उपनगर वार्ताहरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना स्वारगेट परिसरातील महर्षीनगर भागात रविवारी (ता. ११) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणी जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत हर्षद कांतीलाल कटारिया (वय ३९, रा. नयनतारा सोसायटी, महर्षीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वारगेट पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०७ आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ तसेच महाराष्ट्र पत्रकार अधिनियम २०१७ चे कलम ४ नुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षद कटारिया हे रविवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी पाठीमागून दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने पिस्तूलमधून डोक्याच्या दिशेने एक गोळी झाडली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

यापूर्वीही हर्षद कटारिया यांच्यावर २७ मे रोजी सायंकाळी महर्षीनगर येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलसमोरील परिसरात दुचाकीवर आलेल्या दोघांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच फिर्यादी यांना पुन्हा जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने गोळी झाडल्याचा प्रकार घडला.घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाचे सहायक आयुक्त नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले पुढील तपास करीत आहेत.

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *